
आषाढी यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी 11 कोटी रुपयांचे दान केले आहे. तसेच सोन्या, चांदीचे 2 कोटी 59 लाख रुपयांचे दागिने अर्पण केले आहेत. मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून हे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शनरांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आषाढी यात्रा एकादशीला भाविकांची गर्दी वाढल्याने मंदिराच्या उत्पन्नातही भरीव वाढ झाली आहे. भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केल्या. आषाढ शुध्द 01 (दि. 26 जून) ते आषाढ शुध्द 15 (दि. 10 जुलै) या कालावधीत भाविकांनी भरभरुन दान दिले आहे.
असे मिळाले उत्पन्न
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणाजवळ 75,05,291 रुपये अर्पण केले. 2,88,33,569 रुपये देणगी दिली. 94,04,340 रुपये लाडू प्रसाद विक्रीतून मिळाले आहेत. 45,41,458 रुपये भक्तनिवास भाडेपोटी मिळाले आहेत. तर 1,44,71,348 रुपये हुंडीपेटी, 32,45,682 रूपये परिवार देवता. तसेच 2,59,61,768 रुपये सोने-चांदीचे दागिणे अर्पण करण्यात आले आहेत. तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 12,45,075 रुपये व 3 इलेक्ट्रिक रिक्षा, बसचे 32 लाख इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.
मागील वर्षीचे उत्पन्न
मागील वर्षी श्रीं विठ्ठल रुक्मिणीच्या चरणाजवळ 77,06,694 रुपये अर्पण, 2,69,22,578 रुपये देणगी, 98,53,000 रुपये लाडू प्रसाद विक्री, 50,60,437 रुपये भक्तनिवास, 93,55,073 रुपये हुंडीपेटी, 31,79,068 रूपये परिवार देवता तर 2,21,53,601 रुपये सोने-चांदी, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 6,28,109 रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. असे एकूण 8,48,58,560 रुपये उत्पन्न मिळाले होते.
2 कोटी 35 लाखाची वाढ
गत वर्षीच्या सन 2024 च्या आषाढी यात्रेत 8,48,58,560 रुपये तर या वर्षीच्या यात्रेत 10,84,08,531 इतके उत्पन्न मिळाले आहे. मागील यात्रेच्या तुलनेत 2,35,49,971 रुपये इतकी वाढ झालेली आहे. या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणार्या वारकरी, भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.