पहिल्या श्रावणी सोमवारी भीमाशंकरमध्ये भाविकांची दर्शनाला गर्दी; भोलेनाथाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला

बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांनी पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय आणि भोलेनाथाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.

भीमाशंकर येथे अनेक भाविकांनी पहिल्या श्रावणी सोमवारच्या आदल्या रात्री मुक्कामी जात पहाटे पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. पहाटेपासूनच भीमाशंकर येथे भक्तीमय वातावरण होते. त्यानंतर दिवसभरात मंदिर परिसरात मोठया प्रमाणात गर्दी झाली. रिमझीम पाऊस, गडद धुके व बोचरी थंडी यामध्ये भाविकांनी पर्यटनाचा आंनद घेतला. मुंबई, पुणे तसेच इतर राज्यभरातून भाविक येथे दर्शनासाठी दाखल झाले होते. शनिवार, रविवार व सोमवार या तीन दिवसांत लाखो भाविकांनी दर्शन घेतले.

वाहनतळ, बसस्थानक, पायरीमार्ग, मंदिर परिसर आदी मार्गांवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस निरीक्षक, तीन सहायक पोलीस निरीक्षक, 11 पोलीस उपनिरीक्षक, 112 पुरुष पोलीस कर्मचारी व 15 महिला पोलीस कर्मचारी असे पोलीसांचे पथक तैनात करण्यात आले होते. तर एसटी महामंडळाचे सहायक वाहतुक अधिक्षक तुकाराम पवळे व सहायक वाहतुक निरीक्षक प्रशिक्षक मारूती खळदकर व कर्मचारी वाहतुकीचे नियोजन करत होते. मंदिरमध्ये भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, विश्वस्त दत्तात्रय कौदरे, गोरक्ष कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे आदि मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली.