
धारावीतील लोकांना धारावीतच घरे देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर काही दिवसातच मेघवाडी गणेशनगरमधील झोपडय़ा तोडण्याचा इशारा एसआरएने दिला आहे.या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी कामराज हायस्कूलसमोर धारावी बचाव आंदोलन या संघटनेची प्रचंड इशारा जनसभा झाली. आज मेघवाडी गणेशनगरमधील रहिवाशांवर धारावीबाहेर जाण्याचे संकट आलेले आहे. उद्या हे संकट धारावीमधील कुंभारवाडा, कोळीवाडा, आझादनगर, टिळकनगर आदी वस्त्यांवरही येऊ शकते. म्हणून धारावीकरांनो जागते रहो! धारावीकरांनो सतर्क राहा! असे आवाहन शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, माकपचे नेते प्रकाश रेड्डी, आपच्या प्रिती मेनन यांच्यासह सर्वच नेत्यांनी केले.
या इशारा सभेला धारावी बचाव आंदोलनाचे नेते माजी आमदार बाबुराव माने, आमदार महेश सावंत, शेकापचे राजेंद्र कोरडे, साम्या कोरडे, आपचे एन.आर.पॉल, डॉ.जावेद खान, राष्ट्रवादीचे उलेश गजाकोष, अरिफ सय्यद, वंचितचे अनिल कासारे, माकपचे शैलेंद्र कांबळे, संगीता कांबळे, बसपाचे जैस्वार आदींसह असंख्य रहिवाशी उपस्थित होते.
धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत यासाठी पहिला प्रचंड मोर्चा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अदानी कार्यालयावर काढला होता. आता मोठय़ा प्रमाणात धारावीतील रहिवाशांना अपात्र करून धारावीकरांना बाहेर फेकण्याचे कारस्थान सुरू आहे. सरकारला वाटते, गोरगरीबांकडे शक्ती नाही. त्यांच्यात ताकद नाही. आम्ही गोरगरीबांचा आवाज दाबून टाकू… परंतु हे मनसुबे धारावीतील गोरगरीब जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अनिल देसाई यांनी यावेळी दिला. सरकार विकासाच्या नावाखाली धारावीतील लोकांशी खेळ खेळत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
मेघवाडीतील रहिवाशांनी आपली घरे खाली करू नयेत. उलट अदानीलाच पळवून लावा, असे आवाहन माकपचे प्रकाश रेड्डी यांनी केले. आज एक वस्ती हटविण्याची नोटीस आली. उद्या धारावीतील इतर वस्त्याही हटविण्याची नोटीस येईल. यापासून लोकांनी सतर्क सावध राहावे, असे रेड्डी म्हणाले.
अदानीस हडपायची 500 एकर जमीन
देवनार, मुलुंड डम्पिंग ग्राउंडची जमिन अदानी कंपनीने घेतली ती तेथे धारावीतील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी घेतली आहे. धारावीत फक्त 5-10 हजार लोकांना अदानीस घरे द्यायची आहेत.बाकीचे लोक धारावीबाहेर फेकायचे आहेत.आणि यातून अदानीला धारावीची जवळपास 500 एकर जमीन हडप करायची आहे असा आरोप धारावी बचाव आंदोलनाचे नेते बाबुराव माने यांनी केला.म्हणून धारावीतील लोकांनी सावध राहिले पाहिजे.जागते रहो असे माझे आवाहन आहे असेही बाबुराव माने म्हणाले.
आमदार महेश सावंत म्हणाले की, मेघवाडीतील रहिवाशांशी सरकारने करार करावा. अग्रिमेंट करावे. त्यांना हक्काचे घर द्यावे.नाहीतर येथील लोकांनी कोणत्याही परिस्थितीत मेघवाडी खाली करू नये. यासाठी मी तुमच्यासोबत राहीन असे आश्वासन महेश सावंत यांनी मेघवाडीतील झोपडपट्टीवासियांना दिले.
आपच्या प्रिती मेनन म्हणाल्या, धारावी हे मुंबईचे दिल-हृदय आहे. याच्याशी अदानीने पंगा का घेतला. एक दिवस गौतम अदानीला धारावीतील लोकांसमोर गुडघे टेकावे लागेल. अदानीचा अंत आणि मोदी सरकारचा अंतही या धारावीतून सुरू होईल असा इशारा प्रिती मेनन यांनी दिला.





























































