अर्जुन खोतकर यांच्या पीएचे वसुलीकांड, धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहाचे सीसीटीव्ही पोलिसांच्या ताब्यात

विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावे धुळे येथील विश्रामगृहात आरक्षित असलेल्या खोली क्रमांक 102 मधून 1 कोटी 84 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाची जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांनी सखोल चौकशी सुरू केली असून गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील सहा सीसीटीव्ही आणि त्यातील चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विधिमंडळ अंदाज समिती धुळे दौऱ्यावर असताना धुळय़ाच्या शासकीय विश्रामगृहातून कोटय़वधींची रक्कम जप्त करण्यात आली. विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठी पंत्राटदारांकडून या पैशांची जमवाजमव करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत धुळे जिल्हा पोलीस प्रमुख धिवरे यांनी आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी जे. पी. स्वामी यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या अनुषंगाने चर्चा केली. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि विश्रागृहातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

15 मेपासूनची नोंदवही तपासणार

गुलमोहर विश्रामगृहात 15 मेपासून 21 मेच्या रात्रीपर्यंत घडलेल्या सर्व घडामोडींचा तपास करण्यात येणार आहे. विश्रामगृहात येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची नोंद असलेली नोंदवहीदेखील ताब्यात घेण्यात आली आहे. विश्रामगृहात आलेल्या व्यक्ती कशासाठी आल्या होत्या याची चौकशीही केली जाणार आहे.

खोतकर म्हणतात माझा पी.ए. तेथे नव्हताच

गुलमोहर या शासकीय विश्रामगृहावर पैसे सापडलेल्या घटनेशी अंदाज समितीचा काहीही संबंध नाहीत. तसेच पैसे सापडलेल्या खोलीत माझा पी.ए. किशोर पाटील राहत नव्हता, असे अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे.

किशोर पाटीलला अटक करा -दानवे

– खोतकरांचा पी.ए. किशोर पाटील याला अटक करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

फडणवीसांच्या एसआयटी चौकशीवर प्रश्नचिन्ह
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे वसुलीकांडाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली आहे. मात्र आरोपींच्याच विनंती अर्जावर तपास एजन्सी बदला, असे आदेश देणाऱ्या फडणवीसांनी घोषित केलेल्या एसआयटी चौकशीवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.