
रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा स्पाय-अॅक्शन थ्रिलर १९ मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, १८ मार्चला सशुल्क प्रिव्ह्यू शो आयोजित करण्यात आले आहेत. ७ मार्चपासून सुरू झालेल्या आगाऊ बुकिंगला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, केवळ प्रिव्ह्यू शोमधूनच चित्रपटाने सुमारे ४०.५४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
पहिल्या दिवसाच्या (१९ मार्च) प्रदर्शनासाठीही चित्रपटाची जोरदार बुकिंग झाली आहे. देशभरात १५ हजारांहून अधिक शोंसाठी सुमारे ४.७० लाखांपेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली असून, यामधून २९.०२ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. परदेशातही ‘धुरंधर: द रिव्हेंज’ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या आठवड्याच्या शेवटापर्यंत परदेशातील आगाऊ विक्री सुमारे ६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक स्तरावर धुरंधर 2 च्या अॅडव्हान्स बुकिंगची कमाई ₹100 ते ₹120 कोटींच्या घरात पोहोचल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा चित्रपट रिलीजपूर्वीच सुपरहिट ठरण्याच्या मार्गावर असल्याचे मानले जात आहे.
प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता देशभरातील मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये अतिरिक्त शोज वाढवले जात आहेत. काही ठिकाणी तर मध्यरात्री आणि पहाटेचे शोजही ठेवण्यात आले आहेत. अनेक शहरांमध्ये पहिल्या दिवशीचे शोज आधीच हाऊसफुल झाले आहेत.
या सर्व आकडेवारीचा विचार करता, प्रिव्ह्यू शो, पहिल्या दिवसाचे बुकिंग आणि परदेशातील विक्री यांची एकत्रित कमाई १३० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम करू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा चित्रपट पहिल्या भागाचा सिक्वेल असून, हिंदीसह तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.




























































