
बिहार विधानसभा निवडणुकीसारखे निकाल उत्तर कोरिया, रशिया आणि चीन सारख्या देशांमध्ये येतात, जिथे एकाच पक्षाला सर्व मते मिळतात, असं वक्तव्य काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केलं आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ येथे माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
दिग्विजय सिंग म्हणाले आहेत की, “बिहार निवडणुकीत ६२ लाख मते वगळण्यात आली आणि २० लाख मते जोडण्यात आली. निवडणूक आयोगाने आम्हाला कोणाची मते वगळण्यात आली आणि कोणाची जोडण्यात आली याची माहिती दिली नाही.” एसआयआरवर (SIR) भाष्य करत ते म्हणाले की, “मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. पण आता मतदारांवर हा भार टाकण्यात आला आहे. फॉर्म भरा, वडील किंवा आजोबांचा पुरावा द्या. ज्यांनी दहावी उत्तीर्ण केलेलं नाही, त्यांना पुरावा कुठून मिळेल?”
एसआयआर प्रक्रियेत आधारला मान्यता न देण्याबाबत दिग्विजय सिंग म्हणाले, “जर पासपोर्ट आणि बँक खात्याच्या तपशीलांसाठी आधारचा वापर केला जात असेल तर मतदार यादीत आधार का नाही? अकरा कागदपत्रे स्वीकारली गेली, पण आधार स्वीकारला गेला नाही.” ते म्हणाले की, ईव्हीएम आणि मतमोजणीत पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे. एसआयआरबाबत ते म्हणाले की, सर्व विरोधी पक्षांनी आता एकत्रितपणे निर्णय घेतला पाहिजे.


























































