
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील धुसफूसही वाढत चालली आहे. महायुतीमधील शिंदे गट, अजित पवार गटाचे नेते एकमेकांवर आरोप करत असताना आता भाजप नेतेही त्यात मागे नाहीत. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट हे सख्खे भाऊ आहेत तर, अजित पवार गट हा आपला सावत्र भाऊ आहे”, असं वक्तव्य भाजपचे लातूर जिल्ह्याध्यक्ष (ग्रामीण विभाग) दिलीप देशमुख यांनी केलं आहे. यामुळे महायुतीमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
अजित पवार गटाला महायुतीत घेतल्यामुळे आमच्या भाजप कार्यकर्त्यांचं वाटोळं झालं. आमचं काहीही चांगलं झालं नाही, कार्यकर्त्यांचे केवळ वाटोळं झालं आहे आणि हीच आम्हा सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे. काही लोक म्हणतात की आपण आता महायुतीत आहोत तर असं बोलायला नको. परंतु, आमच्यावर अन्याय झाला आहे आणि आम्ही त्याबद्दल बोलणार. कारण आम्ही स्पष्ट बोलणारी माणसं आहोत, असे भाजपचे दिलीप देशमुख म्हणाले.
आपल्या महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे. यामधील पहिला पक्ष म्हणजे भाजपा, दुसरी शिंदे गट आणि तिसरा अजित पवार गट. खरंतर ते (अजित पवार गट) आम्हाला नको होते. कारण भाजपा व शिंदे गट हे दोघे सख्खे भाऊ आहेत. यात कोणाचंही दुमत नाही. मात्र अजित पवार गट हा भाजपाचा सावत्र भाऊ आहे. त्यांना मुळात युतीत कशासाठी घेतलं तेच कळत नाही. आम्ही तेव्हाही याविरोधात बोललो होतो, आजही कार्यकर्त्यांच्या अशाच भावना आहेत, असे दिलीप देशमुख पुढे म्हणाले.