
टीम इंडियाने कसोटी मालिकेत बांगलादेशचा फडशा पाडल्यानंतर न्यूझीलंडलाही टीम इंडिया सहज धुळ चारेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, चाहत्यांच्या अपेक्षेवर न्यूझीलंडच्या दमदार खेळीमुळे पाणी फेरले आणि तब्बल 12 वर्षांनंतर मायदेशात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहलीचा खेळ अगदीच सुमार राहिला होता. त्यामुळे त्याच्यावर टीका सुद्धा झाली. मात्र, टीम इंडियाचा माजी खेळाडू दिनेश कार्तिकने त्याला मोलाचा सल्ला दिला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात विराटने 70 धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र उर्वरित तिन्ही डावांमध्ये तो स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली. यावरून टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि समालोचक दिनेश कार्तिकने त्याला मोलाचा सल्ला दिला आहे. तो म्हणाला की, विराट कोहली साठी ही कसोटी मालिका खूप खराब राहिली. चारपैकी तीन डावांमध्ये त्याने चाहत्यांना निराश केले. फिरकीपटूंविरुद्ध खेळताना त्याला बराच त्रास झाला. टीम इंडियाला फिरकीसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्ट्यांवर खेळायाल आवडते. मात्र, ही मालिका विराटसाठी नव्हती. मागील 2-3 वर्षांमध्ये विराट कोहलीचा फिरकीपटूंविरुद्ध खेळ अगदीच सुमार राहिला आहे. त्यामुळे त्याने शक्यतो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळले पाहिजे, असे दिनेश कार्तिक म्हणाला आहे.
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2008 साली पदार्पण केले. त्यानंतर 2012 साली त्याने शेवटचा रणजी सामना खेळला होता. त्यानंतर आजतागायत त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकही सामना खेळलेला नाही. 1 नोव्हेंबरपासून टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीकडून चाहत्यांना चांगल्या खेळाची अपेक्षा असणार आहे.