अवजड वाहनचालकांवर आता थेट गुन्हे; नियम उल्लंघनप्रकरणी 18 ते 20 जणांवर कारवाई

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह प्रमुख चौकांत दिवसा अवजड वाहनांना बंदी घातल्यानंतरही संबंधित ठिकाणी प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनचालकांवर आता थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसांत शहरातील विविध भागात प्रवेश करणाऱ्या 18 ते 20 वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नियम मोडणाऱ्या अवजड वाहनचालकांबाबत पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येते.

शहरातील गंगाधाम चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. प्रत्यक्षात या चौकात अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी आहे. मात्र, त्यानंतरही बिनदिक्कतपणे अवजड वाहने धावतात. या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंगाधाम चौकाला भेट देऊन पाहणी केली, तसेच शहरात अवजड वाहनांना बंदी असलेल्या चौकात आणि प्रमुख रस्त्यांवर वाहने दिसल्यास कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर मागील दोन ते तीन दिवसांपासून शहरातील मध्यवर्ती भागासह दिवसा अवजड वाहनांना प्रवेशबंदी असलेल्या प्रमुख चौकांत वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

पौड फाटा परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाखाली अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा ट्रक व जेसीबी वाहनांवर कारवाई झाली. वारजे माळवाडी पोलिसांनी वारजे पुलाजवळ तीन वाहनांवर कारवाई करत गुन्हे नोंदवले. पर्वती पोलिसांनी नवरत्न हॉटेल चौकात अतिक्रमण करणाऱ्या अवजड वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले. ही कारवाई यापुढे देखील सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गंगाधाम चौकात उल्लंघन सुरूच
गंगाधाम चौकात अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या मार्गावर दिवसा अवजड वाहनांना प्रवेशबंदी असूनही वाहने सर्रास धावत आहेत. अपघातानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः चौकाची पाहणी करून बंदी असलेल्या मागाँवर कठोर कारवाईचे आदेश दिले. तरीदेखील गेल्या दोन दिवसांत या चौकातून अवजड वाहनांनी पुन्हा वाहतुकीचे उल्लंघन केल्याचे उघड झाले असून, मार्केटयार्ड पोलिसांनी ७ ते ८ वाहनचालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.