
आर्टिफिशीअल इंटेलिजन्समुळे जरी आपले काम सोपे झाले असले तरी त्याचा गैरवापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मवर अश्लील कंटेंट बनवला जात होता. यामुळे एलॉन मस्क यांच्यावर टीका केली जात होती. या अश्लील कंटेंटच्या वादावर एलॉन मस्क यांनी आपली चूक मान्य केली आहे.
हिंदुस्थान सरकारने या प्लॅटफॉर्मवर पसरत असलेल्या आक्षेपार्ह मजकुराची गंभीर दखल घेतल्यानंतर, मस्क यांनी हिंदुस्थानी कायद्यांचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्र सरकारने यापूर्वी स्पष्ट केले होते की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही.केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आक्षेप नोंदवल्यानंतर ‘एक्स’ने तातडीने मोठी कारवाई केली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 3,500 आक्षेपार्ह पोस्ट ब्लॉक करण्यात आल्या असून 600 हून अधिक अकाऊंट कायमची बंद करण्यात आली आहेत. सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम करण्याची आश्वासन कंपनीने दिली असून, यापुढे अशा प्रकारचा अश्लील किंवा आक्षेपार्ह मजकूर प्लॅटफॉर्मवर दिसणार नाही, याची खात्री दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘Grok AI’ च्या मदतीने महिला आणि अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो तयार केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या फिचरचा गैरवापर करून डीपफेक आणि अश्लील कंटेंट तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मोदी सरकारने दिले होते. सरकारने 72 तासांच्या आत यावर अहवाल सादर करण्यास सांगितले होते, ज्यामुळे मस्क यांना ही कारवाई करणे भाग पडले.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एका आठवड्यापूर्वी ‘एक्स’ला या गंभीर त्रुटीबद्दल नोटीस बजावली होती. तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे हा गुन्हा असल्याचे सरकारने ठणकावून सांगितले होते. या कारवाईमुळे आता ‘एक्स’ला हिंदुस्थानातील कठोर डिजिटल नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.




























































