
मुंबईत शंभर टक्के नालेसफाईचा पालिकेचा दावा पहिल्याच पावसात फेल ठरला. मुंबईच्या विविध भागांत पाणी तुंबल्याच्या तक्रारी आल्या असताना म्हाडा आणि पालिकेच्या वादात विक्रोळीच्या टागोरनगर आणि कन्नमवारनगरमध्ये छोटे-मोठे सर्वच नाले तुंडुंब भरून वाहू लागले. शिवाय रस्त्यावर पाणी साचले. अनेक रहिवाशांच्या घरातही पाणी शिरल्याने त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
मुंबईत या वर्षी पालिकेने 31 मेच्या आधीच 100 टक्के नालेसफाई केल्याचा दावा केला. मात्र अजूनही अनेक नाले कचऱयाने भरलेले असल्याचे चित्र आहे. यात विक्रोळीच्या टागोरनगर, कन्नमवारनगरमध्ये नाल्यांची स्थितीही अत्यंत दयनीय आहे. अनेक नाले अजूनही तुंबलेले असल्याने नाल्यातील पाणी रस्त्यावर आणि रहिवाशांच्या घरात घुसण्याचा प्रकार पहिल्याच पावसात समोर आला. या भागात नालेसफाई झाली नसल्यानेच ही स्थिती उद्भवल्याचा संताप रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
रहिवाशांचा संताप
टागोरनगर आणि कन्नमवारनगरमध्ये पाणी शिरले असताना रहिवाशांची मोठी गैरसोय झाली. मात्र रहिवाशी संकटात असताना पालिका किंवा ‘म्हाडा’ प्रशासनाने याकडे ढुंकूनही पाहिले नाही. पहिल्याच पावसात ही स्थिती झाली असताना अजून संपूर्ण पावसाळा बाकी असताना रहिवाशांचे हाल होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.
शिवसेनेचा सतत पाठपुरावा
विक्रोळीत नालेसफाई योग्यरीत्या आणि वेळेत होण्यासाठी स्थानिक शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी वारंवार पालिका प्रशासन आणि म्हाडाकडे पाठपुरावा केला. मात्र म्हाडाकडून हे नाले पालिकेचे असल्याचे सांगण्यात आले तर पालिकेकडून हे नाले म्हाडाच्या अखत्यारित असल्याचे सांगण्यात आले. दोन प्रशासनांच्या वादात येथील नाल्यांची सफाई केली गेली नाही. पावसाळा सुरू झाला तरी नाल्यांतील गाळ तसाच आहे. त्यामुळेच पहिल्याच पावसात टागोरनगर आणि कन्नमवारनगरमध्ये नाले तुडुंब भरून रस्ते व वस्ती पाण्याखाली गेली आणि रहिवाशांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. इतपं होऊनही प्रशासन मूग गिळून गप्प बसलं आहे, असा संताप सुनील राऊत यांनी व्यक्त केला. येथील नालेसफाईची कामे तत्काळ करावीत, अशी मागणी सुनील राऊत यांनी केली.