भाजप नेत्यांनी विश्वासघात केला; शिराळातून अपक्ष निवडणूक लढणार, भाजपचे सम्राट महाडिक यांचा निर्धार

शिराळा विधानसभा मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला उमेदवारीचा शब्द दिला होता. अखेरीस आमचा विश्वासघात केला. भाजपा नेत्यांनी उमेदवार जाहीर करताना विश्वासात घेतले नाही. आता सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर शिराळा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार, अशी घोषणा भाजपचे शिराळा मतदारसंघप्रमुख सम्राट महाडीक यांनी केली.

भाजपने उमेदवारी दिली नाही म्हणून महाडीक यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. रविवारी पेठ नाक्यावर महाडीक यांच्या निवासस्थानी महाडीक गट व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. गर्दीचे रूपांतर मेळाव्यात झाले. यावेळी भाजपकडून झालेल्या अन्यायावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

सम्राट महाडीक व जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडीक यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रमुख नेत्यांशी चर्चा करून शिराळा व ईश्वरपूर मतदारसंघातील आपली भूमिका स्पष्ट करू, असे सांगितले. अनेक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील, जगन्नाथ माळी, स्वरूप पाटील, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, सतीश महाडीक, केदार नलवडे, अमित ओसवाल, डॉ. सचिन पाटील, इसाक वलांडकर, सनी खराडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सम्राट महाडीक म्हणाले, राज्यात सत्ता नसताना आम्ही भाजप पक्षात प्रवेश केला. प्रवेशावेळी आम्हाला शिराळा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यामुळे गेली पाच वर्षे आम्ही लढण्याची तयारी केली. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारासाठी जीवाचे रान केले. त्यामुळे पक्षाने आम्हाला विचारात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता. मात्र, भाजप नेत्यांनी फक्त आश्वासने दिली. आम्हाला महामंडळ, विधान परिषद नको, फक्त शिराळ्यातून उमेदवारी द्या. एवढीच आमची मागणी होती. मी अर्ज भरला, तर मागे घेणार नाही. तुम्हाला पाहिजे तोच निर्णय होईल. सर्वांचा विचार घेऊन निर्णय घेणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी वाळवा तालुक्यातील 48 गावे व शिराळा विधानसभा मतदारसंघांतील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.