जागावाटपावरून महायुतीत राडे सुरू; 288 जागा लढण्याची आमची तयारी, पटेलही बोलले

आगामी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून महायुतीत आतापासूनच राडे सुरू झाले आहेत. मिंधे गटाने 288 जागांवर लढण्याची तयारी केली असल्याचे विधान केले असताना आता अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनीही विधानसभेच्या 288 जागांवर लढण्याची आमची तयारी असल्याचे सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीतील जागा वाटपावरून मोठा बेबनाव पुढे आला होता.  आता विधानसभा निवडणुकीच्या आधीच परस्परांवर दबाव टाकून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न महायुतीमध्ये सुरू आहे.

महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने 85 ते 90 जागांवर दावा सांगितला आहे. छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वीच याबाबतचे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनीही या संख्येला दुजोरा दिला असून राजकीय पक्ष म्हणून इतरांप्रमाणेच आम्हीही 288 जागा लढण्याची तयारी ठेवली आहे,  असे प्रफुल पटेल यांनी गोंदियामध्ये एका पत्रकार परिषदेत सांगितले.

या वेळी प्रफुल पटेल म्हणाले की, आमचे तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामध्ये आम्ही सर्व जागा तर मागू शकत नाही. परंतु आमचे 57 आमदार होते. त्या अनुषंगाने छगन भुजबळ यांनी 85 ते 90 जागांची मागणी पुढे केली. आम्हालाही ही संख्या योग्य वाटते. शिंदे गटही 288 जागांवर लढवण्याच्या तयारी आहे याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, कोणताही राजकीय पक्ष असो युती होण्यापूर्वी त्यांना 288 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी लागते. आम्हीसुद्धा 288 जांगावर निवडणूक लढण्याची तयारी ठेवली आहे.

जेव्हा आपण युती करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा वाटाघाटी करून जागा लढवाव्या लागतात. पण युती होण्यापूर्वी आपण 288 जागांवर लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. राज्यातील प्रत्येक पक्षाचे असे धोरण असते.