
विधानसभेच्या निवडणुकीत गद्दारांना निवडणूक आयोगाच्या कृपेने सत्ता मिळाली. मात्र आगामी महापालिका निवडणुकीत या गद्दारांना घरचा रस्ता दाखवू, असा जबरदस्त निर्धार दिवा येथे झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या दणदणीत मेळाव्यात करण्यात आला. पालिका निवडणुकीची तयारी आतापासूनच शिवसैनिकांनी करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कळवा-दिवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा दिव्यातील सुमित हॉल येथे पार पडला. या मेळाव्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोल ताना ते म्हणाले की, आगामी निवडणूक अतिशय महत्त्वाची असून गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. शिवसैनिकांनी गाफील न राहता महापालिकेवर भगवा फडकवण्याच्या निर्धाराने कामाला लागावे, असे आवाहनही खोत यांनी केले.
यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, लोकसभा सहसंपर्कप्रमुख संतोष जाधव, जिल्हा संघटक तात्या माने, जिल्हा संघटक मृणाल यज्ञेश्वरी, कल्याण जिल्हा सचिव सुधीर पाटील, उपजिल्हाप्रमुख विजय देसाई, रमेश पाटील, राहुल भगत, कल्याण ग्रामीण विधानसभाप्रमुख रोहिदास मुंडे, योगिता नाईक, पुष्पलता भानुशाली, ज्योती पाटील, कल्पना कावळे, शयना घडियाल, चंद्रकांत विधाते, राजेंद्र दहिबावकर, रवींद्र सुर्वे, वैकुंठ म्हात्रे आदी उपस्थित होते. या मेळाव्याचे आयोजन शहरप्रमुख सचिन पाटील, लहु चाळके, विजय कदम यांनी केले.