दिवेआगरमध्ये ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह; मद्यपी कारचालकाने दुचाकीस्वाराला दीड किमी फरफटत नेले, जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यटकांचा सतत ओघ असलेल्या निसर्गरम्य दिवेआगरमध्ये ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची घटना घडली आहे. मद्यपी कारचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीस्वार व त्याची पत्नी रस्त्यावर अक्षरशः फेकले गेले. जखमी अवस्थेतील दुचाकीस्वाराला कारचालकाने तब्बल दीड किमी फरफटत नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महम्मद अर्जबेगी (५४) असे त्यांचे नाव असून पत्नी सिमीन या गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान मद्यपी कारचालक ऋषिकेश जोध (१९) याला अटक केली असून ३ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

दिवेआगरपासून जवळच असलेल्या करलास या गावात राहणारे महम्मद अर्जबेगी हे पत्नीसह शेखाडी येथे शनिवारी दुपारी लग्नसोहळ्यासाठी गेले होते. हा सोहळा आटोपून दोघेही दुचाकीने आपल्या घरी जात होते. दिवेआगरमधील माऊली रिसॉर्टजवळ येताच स्वीफ्ट डिझायर गाडीने त्यांना पाठीमागून जोरदार ठोकर दिली. काही क्षणातच पत्नी सिमीन व महम्मद अर्जबेगी हे दोघेही जमिनीवर कोसळून गंभीर जखमी झाले. धडक दिल्यानंतर कारचालक ऋषिकेश याने गाडी न थांबवता पुढे दामटवली. एवढेच नव्हे तर कारचालकाने बोर्लीपंचतन येथील स्मशानभूमीपर्यंत दुचाकीस्वाराला अक्षरशः फरफटत नेले.

  • पोलिसांनी धाव घेऊन कारचालक ऋषिकेश जोध याला अटक केली. संतप्त जमावाने दिघी सागरी पोलीस ठाण्याला घेराव घातला. तसेच दारुड्या कारचालकाला कठोरातील कठोर शिक्षा करा, अशी मागणी करीत जोरदार घोषणाही दिल्या.
  • पर्यटकांच्या बेफिकिरीमुळे निष्पाप नागरिकाचा बळी गेल्याने श्रीवर्धन तालुक्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.

तिसरी गंभीर घटना

श्रीवर्धन तालुक्यात पर्यटनासाठी राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. पण गेल्या काही वर्षांपासून मद्यपी चालकांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी श्रीवर्धनमध्ये एका नामांकित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हरिहरेश्वर येथे एका महिलेला जीव गमावावा लागला. शनिवारी दिवेआगरमध्ये स्थानिक रहिवासी महम्मद अर्जबेगी यांचा अपघाती मृत्यू झाला. तालुक्यातील ही तिसरी घटना असून मद्यपी पर्यटकांच्या विरोधात कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.