
‘साठ वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईचे लचके तोडण्याचे, मुंबईच्या चिंधड्या उडवण्याचे मनसुबे रचले जात आहेत. त्यावेळी ज्यांना मुंबई हवी होती, त्यांचेच दिल्लीत बसलेले प्रतिनिधी यामागे आहेत. अशा वेळी ‘बटेंगे तो कटेंगे’ हे लक्षात ठेवा. आता चुकाल आणि फुटाल तर संपून जाल. त्यामुळे तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका,’ असा सावधगिरीचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज तमाम मराठीजनांना दिला.
शिवसेना-मनसे युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली. ‘संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश सत्यनारायणाच्या पूजेसारखा आणला गेला नव्हता. त्यासाठी खूप मोठा संघर्ष झाला होता. 105, 107 किंवा त्याहून जास्त मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. आज आम्ही दोघेही ठाकरे बंधू एकत्र बसलो आहोत. त्यामुळे त्याची आठवण होणे स्वाभाविक आहे, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ठाकरे कुटुंबाने दिलेल्या योगदानाचा उद्धव ठाकरे यांनी यावेळी उल्लेख केला. ‘आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील पहिल्या पाच सेनापतींमधील एक सेनापती होते. त्यांच्यासोबत माझे वडील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचे वडील, म्हणजे माझे काका श्रीकांत ठाकरे असे अख्खे ठाकरे घराणे त्यावेळी मुंबईसाठी संघर्ष करत होते,’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
‘आज आम्ही आमचे कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत. एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत. यापुढे मुंबई व महाराष्ट्राकडे कोणी वाकडय़ा नजरेने पाहिले किंवा कपट-कारस्थाने करून मुंबईला महाराष्ट्रापासून, मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा राजकारणातून खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत,’ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. ‘मराठी माणूस सहसा कुणाच्या वाटेला जात नाही आणि त्याच्या वाटेला कुणी गेला तर त्याला परत जाऊ देत नाही,’ असे त्यांनी ठणकावले.
…तर तो संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा अपमान ठरेल
‘महाराष्ट्राने मुंबई मिळवल्यानंतर मुंबईतच मराठी माणसाच्या उरावर उपरे नाचायला लागले होते. त्यावेळी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी बाळासाहेबांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला. त्यानंतर 60-65 वर्षे व्यवस्थित गेली. पण आता पुन्हा मुंबईचे लचके तोडण्याचे, चिंधडय़ा उडवण्याचे मनसुबे रचले जाताहेत. त्यावेळी ज्यांना मुंबई हवी होती, त्यांच्या दिल्लीत बसलेल्या दोन प्रतिनिधींचे हे मनसुबे आहेत. अशा वेळी आपण भांडत राहिलो तर तो संयुक्त महाराष्ट्रासाठी केलेल्या संघर्षाचा व हुतात्मा स्मारकाचा अपमान ठरेल,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठी ऐक्याचा मंगलकलश विजयाचा भगवा फडकवेल, संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास
‘आजचा दिवस ऐतिहासिक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर मराठी ऐक्याचा मंगलकलश महाराष्ट्रात आला. आज पुन्हा एकदा मराठी ऐक्याचा मंगलकलश घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आलेले आहेत. महाराष्ट्राच्या जीवनात तोच आनंदाचा क्षण पुन्हा आला आहे. हाच मंगलकलश मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये विजयाचा भगवा ध्वज फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला फक्त ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात आणि महाराष्ट्रही ठाकऱ्यांच्याच मागे जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.





























































