
>> दिव्या सौदागर
[email protected]
काळजी किंवा चिंता या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत, पण याचा आयुष्यावर नकारात्मक परिणाम होत असेल तर त्यासाठी मानसिक उपचार, समुपदशेन अनिवार्य ठरते. अशावेळी कोणत्याही मार्गाने सामाजिक उन्मादाचा बळी होण्याआधी काही गोष्टींचा विचार आपण सगळ्यांनी विशेषत महिला वर्गानेही करायला हवा.
मनस्वास्थ्याशी निगडित बऱयाच मनोविकारांशी संबंधित समस्या, त्याच्याशी झगडत असलेल्या व्यक्ती आपण या सदरामध्ये बघितल्या आहेत. आज मात्र आपण अशा केसेसबद्दल चर्चा करणार आहोत ज्या आपल्या घरात, आजूबाजूला असतील किंवा ‘आपण स्वतही’ अशा केसेसपैकी एक असू शकू.
हे सांगण्याचं कारण एवढंच की, गेले काही दिवस आपण अशाच एका बातमीने अस्वस्थ झालो आहोत. एका स्वयंघोषित सिद्धपुरुषाने स्त्रियांवर कशा प्रकारे आणि काय अत्याचार केले, त्याची काळी जादू वगैरे बातम्या वाचून आणि त्यासंबंधित व्हिडीओज पाहून हादरून गेलो आहोत. या सगळ्याला कोण आणि कसे जबाबदार आहेत याचा ऊहापोहही आतापर्यंत बराच झाला आहे. या बातमीशी संबंधित बरीच सामाजिक, नैतिक चर्चासत्रंही झडली आहेत आणि झडत आहेत. पण मानशास्त्राrयदृष्टय़ा त्यावर विचार करणं हे आता तितकंच महत्त्वाचं ठरलं आहे. कारण हे फक्त या घटनेपुरतंच मर्यादित नसून अशा प्रकारच्या अनेक घटना आणि अनेक सिद्ध पुरुष-सिद्ध माता असे अनेक अवतार या कलियुगात आपल्या लोकांना आधार (?) देण्यासाठी अवतरले आहेत आणि यापुढेही अवतरत राहतील.
हे असे बुवा किंवा माता खरंच दैवी अवतार असतात का? तर नाही, पण एक निश्चितपणे इथे मी सांगेन की यालाही मानसशास्त्राrय पार्श्वभूमी आहे. ती म्हणजे मानसशास्त्राrय भाषेत ज्याला ‘स्वप्रेमी’, ‘आत्मपूजक’ किंवा नार्सिसिस्टिक म्हटलं जातं अशा व्यक्ती या बुवाबाजीमध्ये अडकलेल्या दिसतात. नार्सिसिझम या मनोविकाराचं हे लक्षणच आहे की, अशा व्यक्ती या स्वतमध्ये भरपूर गुरफटलेल्या असतात. त्यांना इतरांबद्दल सहानुभूती नसते. अशा व्यक्ती आपल्या शाब्दिक सामर्थ्यावर स्वतभोवती प्रशंसकांचे जाळे उभ्या करतात. कारण अशा व्यक्तींना स्व प्रिय असतो, स्वतची स्तुती प्रिय असते. (सरसकट सगळ्याच व्यक्ती या नार्सिसिझम प्रकारात येत नाहीत. परंतु या आजाराची काही लक्षणे त्यांच्यामध्ये निश्चित आढळतात). बरेचदा हे बुवा अनैतिक कृत्यांमध्येही सहभागी असतात. त्यांच्यामध्ये असामाजिक व्यक्तिमत्त्व विकार म्हणजेच अँटीसोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डरची लक्षणे आढळतात. हा मनोविकार गंभीर स्वरूपाचा आहे. ज्यामध्ये बेपर्वाई, गुन्हेगारी, अनैतिकता या समाजविघातक बाबी आढळतात.
जरी असं असलं तरी या लोकांबद्दलचं जनमानसातलं आकर्षण कमी होताना दिसत नाही. आताही कानावर अशाच काहीशा आंधळ्या भक्तीच्या घटना आणि त्यामधील व्यक्ती; विशेषत स्त्रियांचे शोषण होताना दिसलं की, एकच विचार येतो की समाजामध्ये या व्यक्तींचा प्रभाव का? तर याचं उत्तर हेच आहे की, समाजामध्ये दिवसेंदिवस वाढत जाणारी ‘असुरक्षिततेची भावना आणि अपराधगंड‘ आणि समाजाची हीच नस या अशा भोंदूगिरी करणाऱयांनी बरोबर पकडली आहे. अशा समाजाला रुचेल ते आणि तसेच वश करायचे ही खुबी त्यांनी अंगीकारली व त्यांच्या सो कॉल्ड वशीकरणाचा परिणाम हा ‘सामाजिक उन्माद’ किंवा मास हिस्टेरियाचा नमुना आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रत्येक जण आज वेगवेगळ्या विवंचनेमध्ये गुरफटलेला आहे. काही जणांना आर्थिक स्थैर्य हवंय, तर काहींना रात्रीची शांत झोप हवीय. काही जण नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करताहेत, तर काही जण आजारापासून मुक्ती मिळावी यासाठी झटत आहेत. सगळ्याच बाबतीत परिपूर्णतेचा ध्यास व्यक्तीला अजून नैराश्येच्या खोलात लोटू शकतो आणि याचाच फायदा या बाबांकडून, मातांकडून घेतला जातो.
वर म्हटल्याप्रमाणे या भोंदू लोकांना विवंचनेत अडकलेल्या लोकांच्या वर्मावर बोट ठेवणं व्यवस्थित जमतं. कोणाला कसली चिंता आहे? कोणाला काय बोललं तर बरं वाटेल याबाबतीत ही लोक भरपूर ‘स्मार्ट’ असतात. मग त्यांच्याच अनुयायांकडून काही गोष्टींची ‘प्रॅक्टिस’ करून घेतली की, पुढच्या गोष्टी सोप्प्या होतात. आजकालच्या इंटरनेटच्या जमान्यात तर हे सर्व सोप्प झालं आहे. पण खरंच आपलं सगळ्यांचं खासगी आयुष्य इतकं सार्वजनिक आहे का? हा विचार आपण समाजाने करायला हवा.
दुसरी गोष्ट ही की, काळजी किंवा चिंता या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत, पण जर यांचा त्रास होत असेल किंवा दैनंदिन आयुष्यावर जर त्यांच्यामुळे नकारात्मक परिणाम झाला असेल तर त्या केवळ मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणारे तज्ञच हाताळू शकतात. इतर कोणीही नाही. म्हणूनच या अशा सामाजिक उन्मादाचा बळी पडण्याआधी काही गोष्टींचा विचार आपण सगळ्यांनी विशेषत महिला वर्गानेही करायला हवा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आपण महिला भलेही सक्षमीकरणाच्या गोष्टी करतो तरीही खरंच आपण स्वतला सक्षम; मग ते मानसिकदृष्टय़ा का असेना करतोय का? याचं आत्मचिंतन प्रत्येक मुलीने, महिलेने करावं असं मला मनापासून वाटतं. आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेबरोबरच मानसिक सुरक्षा ही महत्त्वाची असते. मानसिक सुरक्षा म्हणजेच – मी स्वतला सुरक्षित मानते, मी स्वतला आहे तशी स्वीकारते, मी स्वतचे निर्णय स्वत विचारपूर्वक घेऊ शकते, स्वतला निवडीचे स्वातंत्र्य देते, स्वतसाठी वेळ काढते, मी माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यास समर्थ आहे.
या आणि अशाच काही गोष्टी आहेत ज्या केवळ स्त्रियांनी नाही तर पुरुषांनीही अंगीकारल्या पाहिजेत किंवा लक्षात तरी घेतल्या पाहिजेत. कारण याच गोष्टी मानसिक स्वास्थ्याकडे घेऊन जातात आणि स्वतचे मानसिक स्वास्थ्य जपणं हा स्वार्थ नसून ती एक गरज आहे.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)



























































