फराळ 15 टक्क्यांनी महागला तरी ‘रेडिमेड’ चकली, चिवडा जोरात

दिवाळी म्हटली की फराळ हवाच. फराळाचा गोडवा आपली दिवाळी अधिक गोड करत असतो. यंदा मात्र दिवाळीच्या फराळाला महागाईची झळ बसली आहे. डाळी, तेल, तूप, खोबरे, शेंगदाणे महाग झाल्याने फराळ महागला आहे. रेडीमेड फराळाच्या दरात 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींचे फराळाचे बजेट कोलमडले आहे.

सध्याच्या धावपळीच्या काळात सर्वच महिला घरी फराळ करत नाहीत. रेडिमेड फराळावर त्यांची भिस्त असते. त्यामुळे रेडिमेड फराळाला वाढती मागणी आहे. गेल्या काही वर्षांत तयार फराळाची वाढती मागणी पाहता केटरिंग, बचत गट, काही घरगुती महिलांनी महिनाभरापासून फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी कंबर कसली आहे. करंजी, चकली, शंकरपाळे, अनारसे, शेव या फराळाच्या पारंपारिक पदार्थांना अधिक मागणी आहे.

गिफ्ट पॅकमध्ये फराळ

फराळाच्या गिफ्ट्स पॅकची मागणी दिसून येते. एक किलो व अर्धा किलोच्या पॅकमध्ये फराळ उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, 450 ते 500 रुपयांच्या पॅकमध्ये चिवडा, तिखट शेव, शंकरपाळे, चकली, अनारसे प्रत्येकी 100 ग्रॅम तसेच बेसन, रवा लाडवांचे प्रत्येकी दोन नग असते.

फराळाचे दर याप्रमाणे

पोहे चिवडा ः 360 ते 450 रुपये किलो
भाजणी चकली ः 480 ते 600 रुपये किलो
शंकरपाळे ः 380 ते 450 रुपये किलो
अनारसे ः 580 रुपये किलो ( प्रति नग 30 रुपये)
चिरोटे ः 580 रुपये किलो (प्रति नग 30 रुपये )
तिखट शेव ः 360 ते 460 रुपये किलो
करंजी ः 640 रुपये किलो
रवा लाडू ः एक नग 22 रुपये
बेसन लाडू ः एक नग 24 रुपये
मोतीचूर लाडू ः एक नग 22 रुपये

ट्रम्प टॅरिफचा फटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानी उत्पादनांवर 50 टक्के आयात शुल्क लावले आहे. टॅरिफचा फटका फराळ व्यावसायिकांना बसला असून हिंदुस्थानातून अमेरिकेत पाठवण्यात येणाऱ्या फराळाच्या हॅम्परच्या ऑर्डरमध्ये तब्बल 30 टक्के घट झाली आहे. 80 टक्के ऑर्डर एकट्या अमेरिकेत जातात. अमेरिकेत तीन किलोचे हॅम्पर पाठविण्यासाठी 7500 तर सहा किलोचे हॅम्पर पाठविण्यासाठी 12 हजार रुपयांचा खर्च येतो. यंदा अमेरिकेत पाठविल्या जाणाऱ्या सर्व पार्सलवर कस्टम ड्युटी भरावी लागत असल्याने फराळाच्या ऑर्डरमध्ये साधारण 25 ते 30 टक्के घट झाल्याची माहिती दादरच्या द फॅमिली स्टोअरचे अभिजीत जोशी यांनी दिली.