दिवाळीची धूम; दीपोत्सव, आतषबाजी, खमंग फराळ, पुणे शहरात धन्वंतरी पूजनाने धनत्रयोदशी साजरी

‘दिन दिन दिवाळी… गायी म्हशी ओवाळी… ‘असं म्हणत दिवाळी सणाला धूम धडक्यात सर्वत्र सुरुवात झाली. वसुबारसला गोवत्स धेनुपूजन झाल्यानंतर शनिवारी धनत्रयोदशी साजरी करण्यात आली. आयुर्वेदाचे जनक धन्वंतरीचे पूजन करण्यात आले. धनाची पूजा करून फटाक्यांच्या आतषबजीत आसमंत उजळून निघाला आणि खऱ्या अर्थाने दिव्यांचा सण असलेल्या दिवाळीला प्रारंभ झाला.

धनत्रयोदशीनिमित्त लक्ष्मी मूर्तीसाठी लागणारे पूजासाहित्य, फराळ, नवीन कपडे खरेदीने बाजारपेठा गर्दनि फुलून गेल्या होत्या, तर किल्ला बांधून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृती स्थापन करण्यात बालचमू रंगून गेले होते. घरोघरी फराळाचा सुगंध दरवळत होता. संध्याकाळी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून भक्तांनी शहरातील प्रमुख मंदिरात दर्शनाला गर्दी केलेली दिसत होती. सोन्या-चांदीचे वाढते भाव असले, तरी बुकिंगमधील सोने घरी नेण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये चांगलीच गर्दी दिसत होती. फटाक्यांच्या स्टॉलवरही गर्दी दिसत होती.

झेंडू, शेवंती, अस्तर, गुलाब, कमळ फुलांचे भाव वाढलेले दिसत आहेत, फुले, केरसुनी, लाह्या बत्तासे असं पूजासाहित्य खरेदीने बाबू गेनू चौक, मंडई परिसरात अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती इतकी गर्दी झालेली दिसत होती. व्यापाऱ्यांनी वर्षभरासाठी लागणारे रोजमेळ, खरावणी, हिशोबाच्या वह्या, पावती पुस्तकं, दिनदर्शिका खरेदीसाठी बोहरी आळीत गर्दी केली होती. ‘दिन दिन दिवाळी’ म्हणत बालगोपाळांनी आणि थोरा मोठ्यांनी शुभ दीपावलीच्या शुभेच्छा देत दिवाळीचा पहिला दिवस उत्साहात साजरा केला.

धनत्रयोदशीच्या निमित्ताने टिळक आयुर्वेद महाविद्यालय व शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदीय रुग्णालय येथे श्री धन्वंतरी पूजन करण्यात आले. समुद्र मंथनातून प्राप्त झालेले पाचवे रत्न धन्वंतरी मूर्तीचे पूजन करून उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

आरोग्यभारती व एस हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी याग व आरोग्य हेच धन या विषयांवर आरोग्य प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजीनगर भाग पुणे संघचालक अॅड. प्रमोद बेंद्रे व प्रमुखपाहुणे म्हणून हेंकेल एडेसिव्हज प्रा.लि. कंपनीचे एशिया पॅसिफिक हेड डॉ. प्रसाद खंडागळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. प्रमोद बेंद्रे होते. कार्यक्रमप्रसंगी एस. हॉस्पिटलचे संचालक प्रा.डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. पडसलगी, डॉ. सागर पाटणकर, आरोग्य भारतीचे पश्चिम प्रांत अध्यक्ष डॉ. व्ही.डी. कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता बेलापूरकर, प्रास्ताविक अमेय वाघ यांनी, तर आभार अविनाश बेलापूरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक अष्टपुत्रे, श्रीपाद जोशी, ओमकार भोसले, चैतन्य फडणीस यांनी परिश्रम घेतले.