आरोग्य – श्रद्धेबरोबरच आरोग्य सांभाळा

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी

उपवास हा एक फक्त श्रद्धेचा भाग न ठेवता डोळसपणे विचार केला तर खाण्यापिण्याच्या निर्बंधाबरोबरच मनाचा निर्बंधही तितकाच महत्त्वाचा आहे.

नवरात्रीची सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने उपवास करणे हा काही लोकांचा अत्यंत श्रद्धेचा विषय आहे. श्रद्धेबरोबरच आरोग्य कसे सांभाळाल त्यासाठी हा प्रयत्न आहे. उपवासामुळे शरीरातील बिघडलेल्या पेशी नष्ट करून शरीर स्वतलाच स्वच्छ करते, आयुष्य वाढते, शरीर निरोगी राहते असा शास्त्राrय अभ्यास जपानी शास्त्रज्ञ योशिनोमी ओहसुमी यांनी केला. त्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले.

आपल्याकडे तर ही संकल्पना पूर्वापार प्रचलित आहे. अगदी  तापापासून अग्निमांद्य व कुठलाही रोग असो, पहिले लंघन हाच उपाय सांगितला आहे, परंतु त्याला धार्मिक स्वरूप दिल्याने आनंद मिळवण्यापेक्षा भीतीपोटी उपवास करण्याचे प्रमाण आता प्रचंड वाढले आहे. उपवासादरम्यान पदार्थांची यादी बघितली तर एकंदर साखर, पिष्टमय पदार्थ, तळण यांचा भडिमार दिसून येतो. दुसरे टोक म्हणजे काहीही न खाता नुसते पाणी पिऊन उपवास करणे, नवरात्रीचे दिवस त्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. त्या दिवसांत अनेक रुग्ण अगदी तरुण वर्गसुद्धा चक्कर, पित्तामुळे होणाऱया उलटय़ा, डोकेदुखी किंवा थकवा यांसारख्या पारी घेऊन दवाखान्यात येतात.

पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पदार्थ उपवासाला चालतो, हा चालत नाही हे कोणी ठरवले? साबुदाणा हा टॅपिओका म्हणजे एक जमिनीखाली वाढणाऱया कंदापासून कृत्रिमरीत्या केलेला पदार्थ. हा उपवासाच्या पदार्थात कधी समाविष्ट केला माहीत नाही. कुठल्याही ग्रंथात, पुराणात उल्लेख नसलेला साबुदाणा आता उपवासाचे प्रमुख अन्न झाले आहे. याचे सेवन केल्याने अचानक साखर वाढणे, पित्त होणे असे नानाप्रकारचे त्रास होतात. तळून काढलेले साबुदाणा वडे हे कुठल्याही दृष्टीने आरोग्यवर्धक अन्न आहे असे कुणीही मान्य करणार नाही.

बटाटा हाही एक असाच पदार्थ आहे, ज्याचा समावेश परकीय असूनही उपवासाच्या पदार्थात झाला आहे. तळून केलेले वेफर्स, बटाटय़ाचा चिवडा असे हजारो पदार्थ उपवासाला खाल्ले जातात आणि त्याचे लगेच परिणाम दिसतात. तेव्हा पुढे दिलेले बदल आपल्या उपवासाच्या आहारात करता येतील का पाहू.

राजगिरा : राजगिरा हा प्रथिनांनी समृद्ध असतो. राजगिरा बियामध्ये आवश्यक अमिनो आम्लांचे उत्तम संतुलन आढळते. यात जीवनसत्व  A, ण् आणि ख् तसेच कॅल्शियम, तांबे, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. राजगिरा नैसर्गिकरीत्या ग्लुटेनरहित आहे, त्यात आण्टिऑक्सिडंट्स आढळतात. पिठाच्या स्वरूपात, गूळ घालून लाडू , चिक्की स्वरूपात उपवसाला खाल्ले पाहिजे. गोड पदार्थ खायचे नसतील तर राजगिरा उकडून त्याचा दही राजगिरा, राजगिऱयाचे घावन, वरी आणि राजगिरा थालीपीठ असे पदार्थ करता येतील.

कंदमुळे हीसुद्धा उकडून, भाजून खाल्ल्यास अतिशय चांगले तंतुयुक्त आणि उपयोगी कर्बोदके असलेले अन्न आहे. श्रीरामांनी वनवासात असताना ही कंदमुळेही खाल्ली होती असा दावा आहे, ज्यामुळे उपवासाला खायला काहीच हरकत नसावी. वराह कंद, सुरण, रताळी, करांदे, अळकुडय़ा असे विविध प्रकार बाजारात आहेत. हे खाल्ल्याने पित्त न होता दुसऱया दिवशी पोटही साफ होईल.

वरीच्या तांदळाचा समावेश करू शकता.

लाल भोपळा उकडून ताक, दह्यातून खाणे हे पूर्वापार सांगितलेले उपवासाचे पूर्ण अन्न आहे. नवरात्रीदरम्यान विषाणूजन्य आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्या काळात लाल भोपळ्यामुळे प्रतिकार क्षमता चांगली राहते.

ताक पिणे हा एक चांगला पर्याय ठरेल. पूर्ण दिवस थोडे थोडे ताक पिऊन अंतरबाह्य शुद्ध होईल आणि उपवासाचे समाधान लाभेल.

फलाहार – आपल्या देशात ऋतूत मिळणारी फळे खाणे हा एक चांगला मार्ग आहे.

भारतातील काही राज्यांमध्ये उकडलेले कडधान्ये उदा. मूग, छोटा हरभरा उपवासाला दिला जातो. हाही एक चांगला पर्याय आहे.

काही राज्यांमध्ये भात न खाणे याला उपवास व्रत समजले जाते.

त्यामुळे उपवास हा एक फक्त श्रद्धेचा भाग न ठेवता डोळसपणे विचार केला तर खाण्यापिण्याच्या निर्बंधाबरोबरच मनाचा निर्बंधही तितकाच महत्त्वाचा आहे.

तेव्हा सारासार विचाराने सर्वांशी नीट वागणे. शिव्या, अपशब्द न काढणे. काम,क्रोध, मद, मत्सर या शत्रूंपासून दूर राहणे. दुसऱयाचे नुकसान न करणे. भ्रष्टाचार, पैसे लुबाडणे असले गुन्हे न करणे. आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे. ध्वनी प्रदूषण करून दुसऱयांना त्रास न देणे. नद्या, नाले, जंगल स्वच्छ ठेवणे हे खरे भगवंताचे स्मरण आहे. मग ते कुठल्याही धर्मात असो.

[email protected]