
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी
आहार–विहारातील कुपथ्य सगळ्यात आधी आपल्या पचनसंस्थेवर आघात करते आणि सुरू होतात पोटाच्या व्याधी. हे टाळायचे असेल तर ऋतूनुसार पथ्य पाळले गेले पाहिजे.
एक बँकेत मोठय़ा पदावर काम करणारे 45 वय वर्षे असलेले गृहस्थ माझ्याकडे पोटाचे दुखणे घेऊन आले. खाल्ल्यानंतर मलप्रवृत्ती, सतत मलप्रवृत्ती येईल अशी भावना. अनेक प्रतिजैविक औषधे घेऊनही काही फरक नव्हता. त्यांना तपासून औषधे दिल्यावर असे वाटले की, याविषयी लिहिले तर त्यामुळे सर्वांना फायदा होईल. म्हणून हा प्रस्तुत लेख.
दुःखाचा शरीर आणि मन यांच्याशी संयोग म्हणजे व्याधी. अनुकूल वेदनीय सुखम् आणि प्रतिकूल वेदनीयम् दुःखम् म्हणजे सुख व दुःख या दोन्ही वेदना आहेत. त्यासाठी भगवद्गीतेत उच्च पदावर पोहोचलेल्या भक्ताचे वर्णन करताना श्रीकृष्ण म्हणाले, ज्याला थंड आणि उष्ण, सुख-दुःख ही समान असतात तो माझा खरा भक्त. खरोखरच सामान्य जीवन राहणीत हा विचार दृकरणे गरजेचे आहे तरच आयुष्य रोगमुक्त राहील.
धी, धृती, स्मृती या तिन्हीचा भ्रंश झाला की, व्याधी सुरू होते असे आयुर्वेद सांगतो. धी म्हणजे सारासार विचार करण्याची बुद्धी. हे बरोबर आहे, हे चूक आहे हे समजून वाईट गोष्टीपासून त्यापासून परावृत्त करणारी म्हणजे धृती आणि एखाद्या गोष्टीपासून त्रास होतो हे स्मरणात ठेवणारी ती स्मृती. या तिन्हीचा भ्रंश झाला की, रोग सुरू होतो असे आयुर्वेद सांगतो. त्यालाच प्रज्ञापराध म्हणतात. पोटातून सर्व शरीराचे पोषण होते आणि रोगांची सुरुवात ही पोटापासून होते. त्यामुळे लोकांना कितीही मनाला पटत असले की, वाटेल ते खाऊ नये त्रास होईल तरी पुनः पुन्हा तीच कृती करत राहतात हाच प्रज्ञापराध आहे. त्यातून प्रवाहिका, अतिसार, ग्रहणी ही रोगांची मालिका सुरू होते. या रोगांमध्ये अग्निमांद्य, भूक न लागणे, चिकट सकफ मलप्रवृत्ती, अपचन, खाल्ल्यानंतर लगेच मलप्रवृत्ती होणे ही महत्त्वाची लक्षणे दिसतात.
सुरुवात द्रव मलप्रवृत्ती किंवा डायरिया ही लक्षणांनी होते. उदाहरणार्थ- प्रवासामध्ये अनोळखी प्रदेशात खाल्ल्यास होणारी द्रव मलप्रवृत्ती अमेरिका, इंग्लंड, युरोपसारख्या देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत हे हमखास दिसून येते. त्याला ट्रव्हलर्स डायरिया ही म्हणतात. यावर वेळीच उपचार नाही केले किंवा झटपट मलप्रवृत्ती बंद होणाऱ्या गोळ्या घेतल्या तर पुताप येणे, पोटात मुरडा मारणे इत्यादी त्रास होऊ शकतात. तसेच अतिसारसारखी व्याधी बरे झाल्यावर अतिप्रमाणात खाल्ल्यानेही ग्रहणीसारखी व्याधी उद्भवू शकते. भोजनानंतर मलप्रवृत्ती होणे हे लक्षण विशेषतः ग्रहणीमध्ये आवारंवार पोटात दुखून मलप्रवृत्ती, हिरवा कफ मलातून बाहेर पडणे अशी लक्षणे दिसतात. यावर उपाय म्हणजे योग्य औषधोपचार आणि आहारावर नियंत्रण.
बहुतांश रुग्णांमध्ये याची सुरुवात दूषित पाणी पिऊन होते. बाहेरील विकत घेतलेले ताक, दूध अथवा उघड्यावरचे ज्यूस, सरबत पिणे, उघड्यावर ठेवलेली कापलेली फळे खाणे, दूषित हाताने हाताळलेल्या अन्नपदार्थ उदाहरणार्थ पाव इत्यादी खाणे. हिरवी मिरची ही कुठल्याही स्वरूपात खाणे उदाहरणार्थ- ठेचा, वाटणातून अथवा वड्यासारख्या झणझणीत पदार्थातून मिरची पोटात गेल्यास पोटाचे विकार सुरू होतात. तसेच अर्ध कच्चे मांस खाणे हे टाळणे अत्यंत आवश्यक आहे.
मनाच्या अवस्थेचा आणि पोटांच्या विकाराचा जवळचा संबंध आहे. मन आनंदित असेल तर पोटात गुदगुल्या होतात, तर खूप भीती वाटली तर पोटात कळ आल्याची भावना होते. लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बुद्धीला चांगले काय, वाईट काय माहिती आहे याचा विसर पडून देऊ नका, तरच रोगावर मात करता येईल. पंचामृत पर्पटी, बेलफळाचा मुरंबा, शंखवटी, कुटजपर्पटी, कुटजारीष्ट अशी व यांसारखी अनेक औषधे आयुर्वेदात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर योग्य वैद्याच्या मार्गदर्शनाखाली करावा. आहाराच्या सवयी सुधाराव्यात. ‘तक्रम् शक्रस्य दुर्लभम्!!’ घरात बनवलेले ताक इंद्रालाही स्वर्गात मिळत नाही असे अमृत पृथ्वीवर उपलब्ध आहे. त्याचे सेवन सैंधव आणि योग्य प्रक्षेपक द्रव्य घालून रोज प्राशन केल्यास पोटाचे विकार लवकर नियंत्रणात येतील. पाणी दूषित असेल तर उकळून पिणे, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे, अनोळखी ठिकाणी शक्यतो न खाणे हे महत्त्वाचे.
बाहेर खायचेच झाल्यास शक्यतो गरम पदार्थ खावेत. थंड आणि हाताळलेले पदार्थ टाळावेत. भूक नसेल तर जेवू नये, पूर्ण भुकेची जाणीव झाल्याशिवाय जेवल्यास अध्यशन होते आणि त्यांनी अपचन होऊन पोटाचे विकार सुरू होतात.
विनाकारण पोट साफ होण्याची औषधे वारंवार घेऊ नयेत. पन्नाशी वयानंतर योग्य पोट साफ होत नसेल किंवा कधी वारंवार जुलाब होत असतील असे आलटून-पाटून होत असेल तर कोलोनोस्कोपीसारखी परीक्षण करून कुठला दुर्धर आजार नाही ना याचे परीक्षण करावे, जेणेकरून लवकर निदान होऊन रोग आटोक्यात येईल.

























































