मंथन – लसीकरणाच्या संशयकल्लोळावर पडदा

>> डॉ. संजय गायकवाड

लसीकरण आणि ऑटिझम याबाबत असलेले गैरसमज पूर्णतः निराधार असल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या निष्कर्षाने लसीकरणाबद्दलची भीती दूर होत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यास मदत होईल.

जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच लसीकरण आणि ऑटिझम यांच्यातील संबंधांबाबत जो निर्वाळा दिला आहे, तो वैद्यकीय क्षेत्रातील एका प्रदीर्घ आणि अनर्थकारी वादावर पडदा टाकणारा ठरला आहे. मुलांमध्ये लसीकरणामुळे ऑटिझमसारखे मानसिक विकार जडतात, हा गेली अनेक वर्षे चर्चिला जाणारा दावा पूर्णपणे निराधार असल्याचे संघटनेने आता स्पष्ट केले असून यासंदर्भात कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नसल्याचे ठामपणे सांगितले आहे. या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी जागतिक तज्ञांच्या समितीने जानेवारी 2010 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत प्रसिद्ध झालेल्या 31 हून अधिक सखोल शोधनिबंधांचे आणि वैज्ञानिक सिद्धांतांचे सूक्ष्म विश्लेषण केले आहे. या प्रदीर्घ अभ्यासानंतर असे सिद्ध झाले आहे की, गर्भधारणेदरम्यान मातेला दिलेली किंवा बालपणात मुलाला टोचलेली कोणतीही लस मुलाच्या मानसिक विकासाला बाधा आणत नाही. ही घोषणा अशा वेळी झाली आहे जेव्हा जगाच्या काही भागांत लसीकरणाविरुद्ध एक निराधार मोहीम राबवली जात होती, ज्यामुळे जनआरोग्यासमोर मोठे संकट उभे राहिले होते.

या संपूर्ण वादाची मुळे 1998 मधील एका वादग्रस्त शोधनिबंधात दडलेली आहेत. प्रसिद्ध ‘लॅन्सेट’ नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या त्या लेखात एमएमआर लसीचा संबंध ऑटिझमशी जोडला गेला होता. केवळ 12 मुलांच्या निरीक्षणावर आधारित असलेला तो दावा वैज्ञानिक निकषांवर अत्यंत तोकडा होता. कालांतराने त्यातील त्रुटी आणि नैतिक उणिवा समोर आल्यानंतर नियतकालिकाने तो लेख मागे घेतला खरा, परंतु तोपर्यंत जनमानसात लसीकरणाबद्दल संशयाचे बीज रोवले गेले होते. जागतिक आरोग्य संघटनेने आता हे स्पष्ट करून दिले आहे की, गेल्या पाच दशकांमध्ये नियमित लसीकरणामुळे जगभरातील 15 कोटींहून अधिक बालकांचे प्राण वाचले आहेत, त्यामुळे केवळ अफवांच्या आधारे जीव वाचवणाऱ्या लसीकरणापासून दूर राहणे आत्मघातकी ठरेल.

ऑटिझम हा मुळात एक न्युरो-डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असून तो मेंदूच्या विकासाशी संबंधित असलेला एक वेगळा पैलू आहे. यात मेंदूचा विकास पूर्णपणे न झाल्यामुळे पीडित व्यक्तीला बाह्य जगाशी संवाद साधण्यात किंवा सामाजिक नातेसंबंध प्रस्थापित करण्यात अडचणी येतात. अनेकदा अशा रुग्णांना समाजाकडून मंदबुद्धी म्हणून हिणवले जाते, परंतु वैद्यकीय शास्त्रानुसार हा एक मोठा भ्रम आहे. ऑटिझमग्रस्त मुले किंवा व्यक्ती मेंदूच्या कार्याच्या दृष्टीने कमकुवत नसून त्यांची विचार करण्याची आणि प्रतिक्रिया देण्याची पद्धत सर्वसामान्यांपेक्षा वेगळी असते. त्यांना समाजात मिसळताना वेगळं वाटणे किंवा नजर मिळवून बोलताना त्रास होणे ही या विकाराची लक्षणे आहेत, बुद्ध्यांकाची कमतरता नव्हे. ‘एम्स’ सारख्या संस्थांनी केलेल्या अभ्यासानुसार, ऑटिझमची मूळ कारणे ही प्रामुख्याने अनुवंशिक असतात. मात्र वाढते प्रदूषण, पर्यावरणातील जड धातूंचा वाढता संपर्क आणि हल्लीच्या काळातील मुलांचा वाढलेला स्क्रीन टाइम म्हणजेच मोबाईलचा अतिवापर हे घटक याला अधिक कारणीभूत ठरत आहेत.

समाजामध्ये ऑटिझमबद्दल आजही अनेक मिथके रूढ आहेत, जी दूर करणे ही काळाची गरज बनली आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशातही गरोदरपणात पॅरासिटामोल घेतल्याने मुलाला ऑटिझम होतो, असे अजब तर्क लावले जात होते, ज्याचे जागतिक आरोग्य संघटनेने वेळीच खंडन केले आहे. आज जगातील दर 127 पैकी एक व्यक्ती या विकारासह जगत आहे, हे वास्तव लक्षात घेता पीडित मुलांच्या पालकांनी अधिक सजग राहणे आवश्यक आहे. जर मूल एकटे राहणे पसंत करत असेल, बोलताना अडखळत असेल किंवा तेज प्रकाशाला आणि आवाजाला अकारण घाबरत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे हितावह ठरते. जागतिक आरोग्य संघटनेच्या या नव्या निर्वाळ्यामुळे लसीकरणाबद्दलची भीती आता कायमची दूर होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजण्यास मदत होईल अशी आशा निर्माण झाली आहे.