सोलापुरात डॉल्बीने घेतला तरुणाचा बळी

सोलापूर हे उत्सव व मिरवणुकीचे शहर म्हणून पुढे येत आहे. मिरवणुकीत डीजे, डॉल्बी सिस्टीम लावून नाचणे ही एक परंपरा सुरू झाली असून, याचा दणका तरुणांना बसत आहे. नुकतेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती सांगता मिरवणुकीत डॉल्बीच्या आवाजाने एका तरुणाचा बळी गेला आहे. अभिषेक संगप्पा बिराजदार असे त्याचे नाव आहे.

शहरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी अनेक मंडळांनी डॉल्बी सिस्टीम व डीजे लावून भव्य मिरवणुका काढल्या. या मिरवणुकीत डॉल्बी व डीजेचा आवाज 100 डेसिबलपेक्षा जास्त असल्याचे आढळले आहे. अभिषेक संगप्पा बिराजदार (वय 27) हा मिरवणुकीतील एका मंडळाच्या डाल्बीसमोर नाचत होता. कर्णकर्कश आवाजाचा भयंकर परिणाम होत असताना तो थकल्यामुळे काही क्षण बाजूला झाला. मात्र, बसल्या ठिकाणीच तो कोसळला. उपचारादरम्यान हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. त्यामुळे कार्यकर्त्यांतही गोंधळ उडाला. डॉल्बीच्या आवाजाने मृत्यू होण्याची घटना सोलापुरात यापूर्वीही घडली आहे. तरी अनेक मंडळे कायदा झुगारून सर्रास डॉल्बी व डीजेचा वापर मिरवणुकीत करतात हे दिसून येत आहे. फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये अभिषेकच्या मृत्यूची नोंद केली आहे.

40 डेसिबलपेक्षा जास्त आवाज हे हानीकारक – डॉ. गांधी
सार्वजनिक सण उत्सवात 40 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे वाद्य, डीजे, डॉल्बी लावणे हानीकारक आहे, असे मत हृदयरोगतज्ञ डॉ. सिद्धांत गांधी यांनी व्यक्त केले. शहरात सध्या मिरवणुकीमध्ये वापरले जाणारे डीजे व डॉल्बीचा आवाज हा 100 डेसिबलपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम बी. पी. वाढणे, ठोके वाढणे, बॉडीचा रिस्पॉन्स कमी होते, हार्मोन्समध्ये बदल होऊन हृदयविकाराचा किंवा पॅरालिसेसचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे जास्त आवाजांची वाद्ये टाळावीत व लोकांत जागृती निर्माण करावी, असे मत डॉ. गांधी यांनी व्यक्त केले.