डोंबिवलीत शिंदे गटाला भाजपचा सुरुंग, शहा भेटीनंतरही पक्षफुटी थांबेना; सदानंद थरवळ यांच्या पुत्रासह दोघांचा प्रवेश

एकमेकांचे पदाधिकारी पळवण्यावरून भाजप आणि शिंदे गटातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’मुळे शिंदे गटाला डोंबिवलीत आज पुन्हा एकदा सुरुंग लागला. शिंदे गटाचे विकास देसले आणि सदानंद थरवळ यांचे पुत्र अभिजित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिंदे गटाने थयथयाट केला. यानंतर दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांचा जाहीर उद्धार केला. दिल्लीतील अमित शहा यांच्या भेटीनंतरही पक्षफुटी थांबत नसल्याने शिंदे गटाच्या तंबूत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी शिंदे गट फोडीचा धडाकाच लावला. त्यांनी ‘ऑपरेशन लोटस’ राबवत कल्याण लोकसभेतील माजी नगरसेवकांसह १५ पेक्षा जास्त पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेतले. ‘ऑपरेशन लोटस’ची मोठी कळ शिंदे गटाला लागली. त्यांच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रवींद्र चव्हाण यांची तक्रार करत कॅबिनेटवर बहिष्कार घातला. मात्र मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगरातून तुम्ही आधी सुरुवात केली असे खडे बोल शिंदे गटाच्या मंत्र्यांना सुनावले होते.

भाजप वारंवार शिंदे गटाला फोडाफोडीचे झटके देत असल्याने एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीत धाव घेत अमित शहांकडे तक्रार केली होती. रवींद्र चव्हाण मोठमोठ्या रकमा देऊन आमचे पदाधिकारी फोडत आहेत अशी कैफियत शिंदे यांनी शहांपुढे मांडली. त्यानंतर हतबल झालेल्या शिंदे गटाच्या नेत्यांनी आता एकमेकांचे पदाधिकारी फोडणार नसल्याचे जाहीर केले. त्याला काही दिवस उलटत नाही तोच आज पुन्हा एकदा भाजपने शिंदे गटाला हादरा दिला.

चव्हाण डोंबिवलीतील वातावरण बिघडवत आहेत- शिंदे गटाचा संताप

शिंदे गटाचे पदाधिकारी विकास देसले आणि अभिजित थरवळ यांच्या पक्षप्रवेशाची माहिती मिळताच शिंदे गटाने डोंबिवलीत तातडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीतील शांत वातावरण बिघडवत असल्याचा थयथयाट केला. ‘एकमेकांचे पदाधिकारी घेणार नाही’ असा निर्णय झाल्यानंतरही भाजपने हा करार भंग केल्याचा आरोप त्यांनी केला.

तुम्ही आमचा एक पदाधिकारी फोडला तर आम्ही तुमचे चार फोडू – भाजपचे प्रत्युत्तर

शिंदे गटाच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनीही पत्रकार परिषद घेतली. त्यांनी आमदार राजेश मोरे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा जाहीर निषेध केला. ‘भाजप हा शांत पक्ष आहे, पण जर तुम्ही आमचे एक नगरसेवक किंवा पदाधिकारी फोडाल, तर आम्ही तुमचे चार फोडू’ असा इशारा परब यांनी दिला. कोकण, उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये शिंदे गटाने युती धर्माचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला.