डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त होणार, शिवसेनेचे उपोषण मागे

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक फेरीवालामुक्त करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे डोंबिवली शहरप्रमुख अभिजित सावंत यांनी इंदिरा चौकात बेमुदत उपोषण सुरू केले होते. अखेर पालिकेने एक महिन्यात रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे सावंत यांनी उपोषण मागे घेतले. गुरुवारी शिवसेना नेते, आमदार अनिल परब यांनी उपोषणस्थळी भेट देऊन फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती.

यानंतर आज पालिका उपायुक्त अवधूत तावडे यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी ‘ग’ आणि ‘फ’ प्रभाग क्षेत्रातील फेरीवाल्यांना हटवून टाटा पॉवर लाइनजवळ स्थलांतरित केले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, जिल्हा संघटक तात्या माने, उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, वैशाली दरेकर, प्रतीक पाटील, सुधाकर वायकोळे, काका तोडणकर, संजय पाटील, शाम चौगले, विलास नायर, विनायक गोवळकर, धनंजय चाळके आदी उपस्थित होते.