
‘डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है’ हा अमिताभ बच्चन यांचा ‘डॉन’ चित्रपटातील संवाद आजही सर्वांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील संवाद, गाणी आणि अॅक्शन सीन प्रचंड गाजले. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अर या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्र बरोट यांचे निधन झाले आहे. 20 जुलै 2025 रोजी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
चंद्र बरोट हे गेल्या 7 वर्षांपासून फुफ्फुसांच्या दुर्धर आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील गुरू नानक रुग्णालयात उपचार सुरू होती. तत्पूर्वी त्यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आजारपण आणि वाढते वयोमान यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
चंद्र बरोट यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चित्रपट निर्माता फरहान अख्तर याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ऑरिजिनल ‘डॉन’चे दिग्दर्शक चंद्र बरोट यांच्या निधनाच्या वृत्ताने खूप दु:ख झाले, असे म्हणत फरहानने त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
View this post on Instagram
कोण होते चंद्र बरोट?
चंद्र बरोट यांनी ‘डॉन’सह अनेक अजरामर चित्रपटाचे दिग्दर्शन, सहाय्यक दिग्दर्शन केले. मनोज कुमार यांच्या ‘पूरब और पश्चिम’, ‘यादगार’, ‘रोटी कपडा मकान’ सारख्या चित्रपटांचे सहाय्यक दिग्दर्शन त्यांनी केले. हिंदीसह बंगाली चित्रपटांमध्येही त्यांनी हात आजमावला होता. 2006 साली फरहान अख्तर याने ‘डॉन’चा रिमेक बनवला होता. त्यावेळी चंद्र बरोट हे पुन्हा प्रकाशझोतात आले होते.