
मध्य पूर्वेतील तणावाने आता भीषण युद्धाचे रूप धारण केले असून गेल्या 13 दिवसांपासून अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज एक खळबळजनक विधान केले आहे. अमेरिकेने इराणविरुद्धचे युद्ध जिंकले असून इराण आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे, असा मोठा दावा ट्रम्प यांनी केला आहे. इराणमध्ये आता हल्ला करण्यासारखे एकही सुरक्षित ठिकाण उरले नसून, इराणचे सर्व महत्त्वाचे नेते मारले गेले आहेत आणि त्यांच्या 58 जहाजांना जलसमाधी दिली आहे, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, इराणने अमेरिकेच्या या दाव्यांना आणि हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. इराणने जागतिक बाजारपेठेला आणि पाश्चात्य राष्ट्रांना गंभीर इशारा देताना म्हटले आहे की, आता कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 200 डॉलर्सपर्यंत पोहोचतील, यासाठी जगाने तयार राहावे. अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना इराणकडून एक लिटरही तेल पोहोचू दिले जाणार नाही, असा इशारा इराणने दिला आहे. त्यांच्याकडे जाणारे कोणतेही तेलवाहू जहाज किंवा टँकर हे आमचे कायदेशीर लक्ष्य असेल, असेही इराणने ठणकावून सांगितले आहे. प्रत्यक्षात 2025 च्या सुरुवातीपासूनच अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विस्तारावरून इस्रायलने इराणला वारंवार इशारा दिला होता, मात्र इराणने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर अमेरिका आणि इस्रायलने तेहरानवर थेट हल्ला चढवला.
या युद्धाचे पडसाद आता थेट हिंदुस्थानच्या बाजारपेठेत उमटण्यास सुरुवात झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या युद्धाचा फटका केवळ इंधनालाच बसला नसून, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे दरही गगनाला भिडले आहेत.






























































