
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प दुसऱयांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या टीमने मोठय़ा प्रमाणावर निधी गोळा केला आहे. निवडणुकीनंतर ट्रम्प व त्यांच्या जवळच्या लोकांनी विविध निधी आणि योजनांसाठी सुमारे 2 अब्ज डॉलर म्हणजे 18 हजार कोटी रुपये जमा केले, असे न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टमधून समोर आले आहे. ही रक्कम त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी गोळा केलेल्या निधीपेक्षाही जास्त आहे.
ट्रम्प यांचे किमान 346 मोठे देणगीदार असे आहेत, ज्यापैकी प्रत्येकाने 2.5 लाख डॉलर किंवा त्याहून अधिक देणगी दिली. या लोकांकडूनच सुमारे 50 कोटी डॉलरपेक्षा जास्त रक्कम आली. यापैकी सुमारे 200 देणगीदार असे आहेत, ज्यांना किंवा ज्यांच्या व्यवसायांना ट्रम्प सरकारच्या निर्णयांचा फायदा झाला. यात सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यांसारख्या सहा हिंदुस्थानी वंशाच्या व्यावसायिकांचा समावेश आहे. सरकारी कागदपत्रे, निधीचे रेकॉर्ड आणि अनेक लोकांशी बोलून हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.
देणगीच्या बदल्यात देणगीदारांना फायदे मिळाले आहेत. कोणाला राष्ट्रपतींकडून माफी मिळाली, कोणाविरुद्ध सुरू असलेले खटले संपले, एखाद्या कंपनीला मोठे सरकारी कंत्राट मिळाले, तर कोणाला थेट ‘व्हाईट हाऊस’पर्यंत पोहोच मिळाली किंवा सरकारमध्ये मोठे पद देण्यात आले.
ट्रम्प यांच्या टीमने कसा निधी जमवला?
ट्रम्प यांच्या टीमने पैसे गोळा करण्यासाठी अनेक वेगवेगळे मार्ग तयार केले. पीएसी ही एक अशी संस्था असते, जी राजकारणासाठी पैसे गोळा करते आणि त्या पैशांतून एखाद्या उमेदवाराला किंवा पक्षाला पाठिंबा देते.
नोव्हेंबर 2024 ते जून 2025 दरम्यान सुमारे 200 दशलक्ष डॉलर्स गोळा केले. याशिवाय ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभासाठी स्थापन केलेल्या समितीने सुमारे 240 दशलक्ष डॉलर्स गोळा केले, जे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक आहेत.
‘व्हाईट हाऊस’मध्ये एक शानदार बॉलरूम बनवण्यासाठीही निधी गोळा केला जात आहे. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, यासाठी सुमारे 350 दशलक्ष डॉलर्स जमा झाले आहेत. हा पैसा ‘ट्रस्ट फॉर द नॅशनल मॉल’ नावाच्या संस्थेद्वारे घेतला जात आहे.
अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 250 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त होणाऱया कार्यक्रमांसाठी स्थापन झालेल्या ‘अमेरिका250’ या संस्थेसाठी, ‘व्हाईट हाऊस’ हिस्टोरिकल असोसिएशनसाठी आणि ‘सिक्युरिंग अमेरिकन ग्रेटनेस’ या राजकीय गटासाठीही निधी गोळा करण्यात आला.


























































