
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आता चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. इराणवर हल्ले करत इस्रायला साथ दिल्यानंतर आखाती देशात अघोषित युद्धजन्य परिस्थिती झाली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी इराणने बंद केल्यामुळे मालवाहू जहाजे, क्रूड ऑइलचे टँकर गेल्या १२ दिवसांपासून अडकले आहेत. आता महागाई मोठ्याप्रमाणात वाढत असून अमेरिकेतील नागरिकांनीच ट्रम्प यांना लक्ष्य करत त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. अनेकांनी भीती व्यक्त केली आहे की ट्रम्प यांच्या इराणवरील हल्ल्यांमुळे अमेरिकेत दहशतवादी हल्ल्यांचा धोका निर्माण होऊ शकतो. हे सारे एपस्टिन फाईलमध्ये आलेल्या नावावरून लक्षं हटवण्यासाठी सुरू असल्याचा संशय देखील अनेकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या अडचणी वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे.
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथील ‘नॅशनल मॉल’ परिसरात मंगळवारी १० मार्च रोजी एक विचित्र आणि उपरोधिक पुतळा बसवण्यात आला आहे. प्रसिद्ध चित्रपट’टायटॅनिक’ मधील आयकॉनिक पोझमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मानवी तस्करीप्रकरणातील आणि सेक्स स्कँडलचा गुन्हेगार जेफ्री एपस्टिन यांना दाखवण्यात आले आहे. या पुतळ्यामुळे अमेरिकन राजकारणात नवा वाद उफाळून आला आहे.
सोनेरी रंगाचा स्प्रे मारलेला हा पुतळा साधारण १२ फूट उंच आहे. यामध्ये एका जहाजाच्या पुढील भागावर डोनाल्ड ट्रम्प हे जेफ्री एपस्टिन यांच्या मागे उभे असून त्यांनी टायटॅनिकमधील ‘जॅक आणि रोझ’ सारखी पोझ दिली आहे. या शिल्पाला “किंग ऑफ द वर्ल्ड” (जगाचा राजा) असे नाव देण्यात आले असून, वॉशिंग्टन स्मारकाच्या दिशेने त्यांचे तोंड आहे. पुतळ्यासोबतच ‘मेक अमेरिका सेफ अगेन’ (Make America Safe Again) असे स्लोगन असलेले बॅनर्सही लावण्यात आले आहेत.
The King of the World honors the friendship between Trump and Epstein, just like Jack and Rose on the Titanic. By the brilliant team of the Secret Handshake pic.twitter.com/3yFtb6AbVR
— Joe Flood (@joeflood) March 10, 2026
‘द सीक्रेट हँडशेक’ची कलाकृती
‘द सीक्रेट हँडशेक’ नावाच्या एका अज्ञात कलाकार समूहाने हा पुतळा बसवला आहे. पुतळ्याखालील पाटीवर उपरोधिकपणे त्यांच्या मैत्रीचे वर्णन ‘tragic love story’ ‘शोकांतीका असलेली प्रेमकथा’ असे केले आहे. आलिशान प्रवास, पार्ट्या आणि गुप्त नग्न रेखाचित्रे (Secret Nude Sketches) यावर ही मैत्री आधारलेली असल्याचे या पाटीवर नमूद केले आहे.
या समूहाने नॅशनल मॉलमध्ये बसवलेली ही तिसरी कलाकृती आहे. यापूर्वी २०२५ मध्ये त्यांनी ‘बेस्ट फ्रेंड्स फॉरएव्हर’ नावाचा पुतळा बसवला होता, ज्यामध्ये हे दोघे एकमेकांचा हात धरून उभे होते. हे पुतळे फोम, लाकूड आणि तारांपासून बनवलेले असून त्यांना ब्राँझसारखा लूक देण्यात येतो.
वादाची पार्श्वभूमी
जेफ्री एपस्टिन यांच्याशी असलेल्या जुन्या संबंधांवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असतानाच हा पुतळा समोर आला आहे. २०१९ मध्ये तुरुंगात मृत्यू झालेला एपस्टिन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार होता. या प्रकरणात अनेक बड्या राजकारण्यांची आणि श्रीमंत व्यक्तींची नावे समोर आली होती, ज्यात ट्रम्प यांचाही समावेश असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. नॅशनल पार्क सर्व्हिसकडून परवानगी असल्याचे कलाकार सांगत असले, तरी सहसा असे पुतळे काही दिवसांतच हटवले जातात.

अमेरिकेत व्यक्ती आणि विचार स्वातंत्र्यांचा पुरस्कार केला जातो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कसेही वागत असले तरी त्यांच्यावर खुली टिका केली जाते. अमेरिकेत याआधी देखील ट्रम्प यांच्या विरोधात विविध राज्यांत नागरिक रस्त्यावरून निदर्शने करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. अगदी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात स्टेजवरू ट्रम्प यांच्यावर टिका झाल्याची पाहायला मिळाली होती.

























































