
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हिंदुस्थान आणि चीनसह काही देशांवर आणखी टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी ट्रम्प प्रशासनाने ‘कलम 301’नुसार तपास सुरू केला आहे. या देशांमधील कंपन्या अमेरिकन कंपन्यांचे नुकसान करीत असल्यास या कायद्यांतर्गत एकतर्फी टॅरिफ लावण्याचा अधिकार ट्रम्प यांना मिळतो. या देशांची धोरणे अमेरिकेनुसार नसल्यास अमेरिका टॅरिफ लावणार आहे. तुमच्या देशाची धोरणेसुद्धा अमेरिकेच्या फायद्याची हवीत, अन्यथा टॅरिफ लागणार, असे अमेरिकेची एकूण भूमिका आहे.
गेल्या महिन्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांनी लावलेले टॅरिफ अवैध ठरवत ते रद्द केले होते. त्यानंतर ट्रम्प प्रशासन टॅरिफ लावण्यासाठी वेगवेगळ्या वाटा शोध आहे. आता एक नवा मार्ग ट्रम्प प्रशासनाने शोधला आहे. अमेरिकेचे व्यापारी भागीदार असलेल्या 16 देशांवर टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहे. कलम 301 हा 1974च्या व्यापारी कायद्याचा भाग आहे. एखादा देश अनुचित पद्धतीने व्यापार करत असल्यास अमेरिकेला या कायद्यानुसार त्या देशावर टॅरिफ किंवा प्रतिबंध लावता येतो. देश गरजेपेक्षा खूप जास्त प्रमाणात उत्पादन करून अमेरिकेत स्वस्तात विक्री करत आहेत, अशा देशांची चौकशी करण्यात येत आहे.
नवे टॅरिफ कधी लावणार?
अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांच्या माहितीनुसार, काही महिन्यांमध्ये तपास पूर्ण होईल. त्यानंतर या वर्षी उन्हाळ्यापर्यंत नवे टॅरिफ लावण्यात येईल, असा अंदाज आहे.
कोणत्या देशांचा तपास सुरू?
ट्रम्प प्रशासनाने हिंदुस्थान, चीन, युरोपियन महासंघ तायवान, जपान, मेक्सिको, व्हिएतनाम, थायलँड, दक्षिण कोरिया, मलेशिया, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, कंबोडिया, बांगलादेश, नॉर्वे आणि सिंगापूर या देशांचा तपास सुरू केला आहे. या देशांमुळे अमेरिकेचे नुकसान होत आहे का याचा तपास करण्यात येत आहे.































































