आखाती देशांना ट्रम्प म्हणाले ‘अत्यंत धोकादायक ठिकाण’ ! अमेरिका सैन्य मागे घेणार; मोठ्या तणावाचे संकेत

रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आखाती देशातील तणाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. आखाती देशांमध्ये इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष सुरू आहे. त्यातच अमेरिका इराणला सातत्याने हल्ल्याची धमकी देत आहे. तसेच इराणनेही अमेरिकेशी पंगा घेत त्यांनी हल्ला केल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. तसेच अण्वस्त्र करार अद्याप झालेला नाही. त्यातच ट्रम्प यांनी आखाती देशांना अत्यंत धोकायदाक ठिकाण असे संबोधत आखाती देशातून सैन्य मागे घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आखाती देशातील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका मध्य पूर्वेतील देशातून म्हणजेच आखाती देशातून काही सैन्य मागे घेणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले. इराक, कुवेत, कतार, बहरीन आणि संयुक्त अरब अमिरातीसह प्रमुख तेल उत्पादक प्रदेशात अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. अणुकार्यक्रमावरील चर्चा अयशस्वी झाल्यास इराणवर हल्ला करण्याची ट्रम्प यांनी वारंवार धमकी दिली आहे. आता अमेरिका सैन्य मागे घेणार असल्याने तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले की अमेरिकन सैन्याला मध्य पूर्वेतून बाहेर काढले जात आहे कारण ते एक धोकादायक ठिकाण असू शकते. तसेच अमेरिका कोणत्याही परिस्थितीत इराणला अण्वस्त्रे ठेवू देणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. अमेरिका त्यांच्या इराकी दूतावासाचे अंशतः स्थलांतर करण्याची तयारी करत आहे आणि या प्रदेशातील सुरक्षा धोक्यांमुळे लष्करी अवलंबितांना मध्य पूर्वेतील ठिकाणे सोडण्याची परवानगी देईल, असे अमेरिका आणि इराकी सूत्रांनी सांगितले. चार अमेरिकन आणि दोन इराकी सूत्रांनी कोणत्या सुरक्षा धोक्यांमुळे हा निर्णय घेण्यात आला हे सांगितले नाही आणि संभाव्य स्थलांतराच्या अहवालांमुळे तेलाच्या किमती 4% पेक्षा जास्त वाढल्या आहेत हे सांगितले नाही.

एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की परराष्ट्र विभागाने बहरीन आणि कुवेतमधून स्वेच्छेने निघण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकेच्या नवीनतम भूमिकेचे प्रतिबिंबित करण्यासाठी परराष्ट्र विभागाने बुधवारी संध्याकाळी जगभरातील प्रवासासाठी मार्दगर्शक तत्त्वे जाहीर केली. वाढत्या प्रादेशिक तणावामुळे परराष्ट्र विभागाने गैर-आणीबाणीच्या अमेरिकन सरकारी कर्मचाऱ्यांना निघून जाण्याचे आदेश दिले,” असे त्यात म्हटले आहे.

अमेरिकेने काही कर्मचाऱ्यांना आणि सैन्याला मागे घेण्याचा निर्णय आखाती देशातील तणाव वाढत असताना घेतला आहे. इराणशी अणुकरार करण्याचे ट्रम्पचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणानी संकेत दिले आहेत की, इस्रायल इराणच्या अणु सुविधांवर हल्ला करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे ते एक धोकादायक ठिकाण असू शकते आणि आम्ही सैन्याला तेथून बाहेर पडण्याची सूचना दिली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे आखाती देशातील तणाव वाढण्याचे संकेत मिळत आहे.