
गेल्या महिन्याभरापासून आखाती देशात युद्धाचा भडका उडाला आहे. या धुमसत्या संघर्षात आता अमेरिकेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे. गुरुवारी राष्ट्रला संबोधित करताना ट्रम्प यांनी ‘ऑपरेशन एपिक फ्यूरी’ अजूनही सुरू आहे, युद्ध संपलेले नाही असे त्यांनी स्पष्ट केले. जर इराणने शरणागती पत्करली नाही किंवा करार केला नाही, तर त्यांना अशा भीषण हल्ल्याचा सामना करावा लागेल जो त्यांना थेट ‘अश्मयुगात’ घेऊन जाईल. या इशाऱ्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ माजली आहे.
इराणमधील महत्त्वाचे लष्करी टार्गेट्स लवकरच उद्ध्वस्त केले जातील, असा इशारा ट्रम्प यांनी आपल्या भाषणादरम्यान दिला आहे. जर इराणने करारासाठी नमती भूमिका घेतली नाही, तर त्यांच्या सर्व वीज प्रकल्पांवर (पॉवर प्लांट्स) एकाच वेळी भीषण हल्ला केला जाईल. गेल्या चार आठवड्यांत अमेरिकन सैन्याने युद्धभूमीवर निर्णायक विजय मिळवला असून, इराणची नौदल आणि हवाई दलाचा जवळपास खात्मा झाला आहे, असा दावाही त्यांनी केला.
इराणमधील सत्तांतराबाबत भाष्य करताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेचे उद्दिष्ट कधीही सत्तापालट करण्याचे नव्हते, परंतु सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर तिथे परिस्थिती बदलली आहे. सध्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) वरील इराणचे नियंत्रण पूर्णपणे ढासळले असून त्यांचे अनेक मोठे नेते मारले गेले आहेत, असे ट्रम्प यांनी सांगितले.
येणारे दोन ते तीन आठवडे या युद्धासाठी अत्यंत कठीण असतील, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. इतिहासात कधीही कोणत्याही शत्रूचे इतक्या कमी वेळात आणि अचूक पद्धतीने नुकसान झाले नसेल, इतका मोठा फटका इराणला बसला असल्याचे ट्रंम्प म्हणाले आहेत. जोपर्यंत अमेरिकेचे सर्व उद्दिष्ट पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे लष्करी अभियान थांबणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.



























































