
अमेरिका फर्स्ट धोरणाचा प्रचार करताना हिंदुस्थानी नागरिकांना हिणवणाऱ्या लॉरा लूमर यांचे हिंदुस्थानात येताच सूर बदलले आहेत. हिंदुस्थानविरोधी सोशल मीडिया पोस्टबद्दल त्यांनी माफी मागितली. याशिवाय पाकिस्तान हा जगाला इस्लामिक दहशतवाद देणारा देश असून अमेरिकेने पाकिस्तानच्या सरकारसोबत मैत्री करू नये, असे म्हणत लूमर यांनी ट्रम्प यांच्या धोरणाला विरोध करत पाकिस्तानवर निशाणा साधला.
लॉरा लूमर या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात. दिल्लीत एका कार्यक्रमात त्या म्हणाल्या की, ‘एक्स’वर मी हिंदुस्थानबाबत तसे बोलायला नको होते. माझ्या वक्तव्याबद्दल मी माफी मागते. मात्र, एच1-बी व्हिसा कार्यक्रमाला विरोध केल्याबाबत मी माफी मागणार नाही. माझे काम अमेरिकेच्या हितांसाठी असून, आमच्या इमिग्रेशन कायद्यांचा गैरवापर झाल्याचे त्या म्हणाल्या.
लूमर यांनी हिंदुस्थानविरोधी अनेक टिप्पण्या केल्या होत्या. हिंदुस्थानी नागरिकांना त्यांनी ‘थर्ड वर्ल्ड इन्व्हेडर’ म्हणजेच मागासलेले म्हणून हिणवले होते. व्हाईट हाऊसमध्ये हिंदुस्थानी करीचा वास पसरेल, हिंदुस्थानात पाणी नाही, बॉलीवूडमध्ये ‘रेप कल्चर’ आहे, इत्यादी हिणवणाऱ्या पोस्ट त्यांनी ‘एक्स’वर टाकल्या होत्या.
पाकिस्तानपासून लांबच बरे
पाकिस्तानबाबत लूमर म्हणाल्या की, पाकिस्तान हा जिहादी समर्थक देश आहे. अमेरिकेने पाकिस्तानपासून लांब राहायला हवे, असे लूमर म्हणाल्या.

























































