
इराणमध्ये महागाई आणि बेरोजगारीविरोधात सार्वजनिक निदर्शने चौदाव्या दिवशीही सुरूच आहेत. इराणच्या कानाकोपऱ्यातून खोमेनी सरकारविरुद्ध निदर्शने होत आहेत. इंटरनेट ब्लॅकआउट 60 तासांवर पोहोचला आहे. आता अमेरिकेने इराणच्या परिस्थितीत हस्तक्षेप करत तेथील जनतेला स्वातंत्र्य हवे असल्यास अमेरिका मदत करेल, असे सांगत खोमेनी सरकारला इशारा दिला आहे. या इशाऱ्यामुळे तेहरानच्या राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. इराणने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याला धमकी देत प्रत्युत्तर दिल्याने इस्रालयल अलर्टवर आहे.
अमेरिकेने इस्लामिक रिपब्लिकवर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य आणि इस्रायलला लक्ष्य केले जाईल. इराणी संसदेतून ट्रम्प यांना प्रत्युत्तर देण्यात आल्याने जगभरात याची चर्चा होत आहे. एक कट्टरपंथी नेता कालिबाफ यांनी अमेरिकेला थेट धमकी दिली आहे. त्यांनी यापूर्वी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली आहे. त्यांनी थेट इस्रायलला धमकी दिली आणि त्याला व्यापलेला प्रदेश म्हटले. ते म्हणाले, इराणवर हल्ला झाल्यास, व्यापलेला प्रदेश आणि या प्रदेशातील सर्व अमेरिकन लष्करी सुविधा, तळ आणि जहाजे आमचे कायदेशीर लक्ष्य असतील.
द टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपाच्या शक्यतेमुळे इस्रायल हाय अलर्टवर आहे. इराणमध्ये निदर्शने अत्यंत हिंसक झाली आहेत. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खोमेनी यांना धमकी दिली, अमेरिका इराणला मदत करण्यास तयार आहे. इराणची जनतेला स्वातंत्र्य हवे असेल तर अमेरिका त्यांना मदत करण्यास तयार आहे. ट्रम्प यांच्या धमकीचे जगभरात परिणाम दिसत असून इराणच्या प्रत्युत्तरानंतर इस्रायल अलर्ट मोडवर आहे.


























































