दोस्त दोस्त ना रहा, काँग्रेस नेते जयराम रमेश यांची पंतप्रधान मोदींवर टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ लादला आहे. त्यावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दोस्त दोस्त ना रहा अशी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. तसेच ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री आपल्याला खूप महागात पडली असेही रमेश म्हणाले.

जयराम रमेश म्हणाले की, ‘दोस्त दोस्त ना रहा’ हे एक लोकप्रिय गाणं आहे. पंतप्रधान मोदींना हे गाणं माहीतच असेल. ‘दोस्त दोस्त ना रहा, ट्रम्प यार हमें तेरा ऐतबार ना रहा’. मोदींनी ‘हाउडी मोदी’ आणि ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम केले. ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ म्हटलं. फोटोसेशन्स झाले. आमचे परराष्ट्र मंत्री ट्रम्प यांच्या शपथविधी कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसले होते. असं सांगितलं गेलं की पंतप्रधान आणि ट्रम्प यांच्यात खास मैत्री आहे, ते जुने मित्र आहेत… पण याचा परिणाम काय झाला? आता आयातशुल्क वाढवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. ही मैत्री आपल्याला खूप महागात पडली असे जयराम रमेश म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यायला हवं. अनेक वर्षांपासून ते सांगत होते की ट्रम्प यांच्याशी त्यांचे खास संबंध आहेत, ते एकमेकांना मिठ्या मारतात, फोटो काढतात, चर्चा करतात. सुरुवातीला ट्रम्प म्हणाले की हिंदुस्थान पाकिस्तान संघर्षादरम्यान त्यांनी मध्यस्थी केली, त्यांनी शस्त्रसंधी घडवून आणली. हे त्यांनी 32-33 वेळा सांगितलं. पण पंतप्रधान मोदींनी यावर काहीही भाष्य केलं नाही. आता परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन दिलं आहे, पण स्पष्ट आहे की आपल्या अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये बिघाड झाला आहे… आज चीन, अमेरिका आणि पाकिस्तान यांचे आपल्यासाठी एक मोठं आव्हान बनलं आहे असेही जयराम रमेश म्हणाले.