लंडनमध्ये हायगेट स्मशानभूमीत डॉ. अशोक ढवळे यांचे आज कार्ल मार्क्स स्मृती व्याख्यान

साम्यवाद आणि समाजवादाचे क्रांतिकारी प्रणेते कार्ल मार्क्स यांचा 14 मार्च हा 142वा स्मृती दिन. दरवर्षी लंडनच्या हायगेट स्मशानभूमीत कार्ल मार्क्स स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात येते. यंदाचे कार्ल मार्क्स स्मृती व्याख्यान देण्याचा मान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांना मिळाला आहे. उद्या (दि. 16) डॉ. अशोक ढवळे यांचे येथे व्याख्यान होणार आहे.

कार्ल मार्क्स यांच्या मृत्यूप्रसंगी त्यांना आदरांजली वाहणारे अप्रतिम भाषण 17 मार्च 1883 रोजी त्यांचे अत्यंत जिवलग कॉम्रेड आणि मित्र फ्रेडरिक एंगेल्स यांनी लंडनच्या हायगेट स्मशानभूमीत केले होते. तेव्हापासून दरवर्षी 14 मार्च या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मार्क्स स्मृती व्याख्यान लंडनच्या हायगेट स्मशानभूमीत आयोजित केले जाते. त्याचे आयोजन गेली अनेक वर्षे ब्रिटिश कम्युनिस्ट पक्ष आणि लंडनची मार्क्स मेमोरियल लायब्ररी संयुक्तपणे करतात. जगभरातील कम्युनिस्ट नेते आणि मार्क्सवादी विचारवंतांना हे व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले जाते.

यंदा कार्ल मार्क्स यांच्या 142 व्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान देण्याचा मान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांना मिळाला आहे. ब्रिटनमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या 15 आणि 16 मार्च रोजी होणाऱ्या त्रैवार्षिक अधिवेशनासही डॉ. अशोक ढवळे हे पॉलिट ब्युरोतर्फे हजर राहून संबोधित करतील.