
>> डॉ. मंजिरी भालेराव, [email protected]
भारताच्या प्राचीन संस्कृतीची छाप जगात उमटविणारे जागतिक वारसास्थळांमधील लोकप्रिय ठिकाण म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा. अजिंठा लेणींचे स्थापत्य, कलासौंदर्य व जाणून घेताना प्राचीन इतिहासाचे अनेक पदर उलगडले जातात.
जगातील पर्यटकांना भारतामधील जागतिक वारसा स्थळांमध्ये सर्वात जास्त आकर्षण असलेल्या स्थळांमध्ये एक नाव हे अजिंठा या स्थळाचे असते. ते छत्रपती संभाजीनगरमधील या स्थळाला तसेच या परिसरातील वेरुळालाही आवर्जून भेट देतात. खरे तर छत्रपती संभाजीनगरपासून वेरुळ हे 30 कि.मी. अंतरावर आहे, तर अजिंठा हे 101 कि.मी. अंतरावर आहे.
असे हे जगप्रसिद्ध अजिंठा आधुनिक काळातील संशोधक आणि अभ्यासक यांच्यापासून बराच काळ दरीत, झाडीत लपलेले होते, पण स्थानिक गावकऱयांना त्यांची माहिती होती. या परिसरातील डोंगर, झाडी आणि नदी हे सगळे वाघांच्या वास्तव्याला पोषक होते. स्थानिक लोक परंपरेने त्या नदीचे नाव वाघोरा आहे असेच सांगतात. 28 एप्रिल 1819 या दिवशी ब्रिटिश सैन्यातील अधिकारी जॉन स्मिथ याने वाघाचा पाठलाग करत असताना या दरीतील नदीच्या काठी असलेल्या अनेक लेण्यांपैकी एक असलेल्या आणि आज लेणे क्र. 10 या क्रमांकाने ओळखल्या जाणाऱया लेण्यात प्रवेश केला. आतमधले दृश्य पाहून तो अचंबित झाला. भला मोठा स्तूप, उंच खांब आणि चित्रांनी भरलेल्या भिंती असे अद्भुत दृश्य त्याने पहिले. तेव्हा त्याने एका खांबावर आपले नावही कोरून ठेवले. आजही ते नाव आपल्याला पाहता येते.
या घटनेनंतर अजिंठा येथील शैलगृहांचा अभ्यास खऱया अर्थाने सुरू झाला. अनेक ब्रिटिश आणि भारतीय अभ्यासकांनी या लेणीसमूहाचा अभ्यास स्वतच्या पद्धतीने केला. यामधील बऱयाच लोकांचा अभ्यासाचा मुख्य विषय म्हणजे इथली भित्तीचित्रे हा होता. त्यावेळेस या सर्व लेणीत वेगवेगळ्या मार्गांनी प्रवेश करावा लागत असे. त्या सर्वांना एका रस्त्याने जोडण्याचे महत्त्वाचे काम हे नंतर करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात हा सगळा भाग हैदराबादच्या निझामाच्या अंमलाखाली होता. त्याच्या अधिकाऱयांनी या स्थळाची डागडुजी केली आणि शैलगृहात पोचण्यासाठी मार्ग तयार झाला. गुलाम याझदानी या इतिहास अभ्यासकाने येथील चित्रांचा अभ्यास केला.
आपण पूर्वीच्या लेखांमध्ये पाहिले आहे की, बौद्ध शैलगृहांचे दोन प्रकार पडतात 1) चैत्यगृह आणि 2) विहार. इ.स.पूर्व दुसऱया शतकापासून बौद्ध लेण्यांची निर्मिती होत होती. त्या काळात बुद्धाची मूर्ती करायचीही परंपरा नव्हती. त्यामुळे इ.स. पूर्व दुसरे शतक ते इ.स.चे 2रे-3रे शतक या काळापर्यंत तयार झालेल्या बौद्ध लेण्यांमध्ये गौतम बुद्धाची एकही मूर्ती दिसत नाही. त्यानंतर मात्र दगडातील मूर्ती आणि चित्रांमधून त्यांचे अंकन हे मोठय़ा प्रमाणावर आढळते. जी शैलगृहे इ.स. दुसऱया शतकाच्या आधी तयार झाली होती, पण त्यात बुद्धमूर्तीचे अंकन नव्हते. त्यातही इ.स. दुसऱया शतकानंतर गौतम बुद्धाची चित्रे काढली गेली. त्यामुळे भाजे, पितळखोरा, अजिंठा, कार्ले येथील जुन्या शैलगृहांमध्ये अशा प्रकारची चित्रे पाहायला मिळतात.
अजिंठा येथील लयननिर्मिती दोन टप्प्यांत झाली. पहिला टप्पा म्हणजे इ.स.पूर्व 2 रे – 1 ले शतक ते इ.स. 2 रे-3 रे शतक. दुसरा टप्पा म्हणजे इ.स.चे 5 वे शतक. पहिल्या टप्प्यात लेणी क्रमांक 10, 9, 8, 12, 13, 15-अ यांची निर्मिती झाली. उरलेली सर्व लेणी ही इ.स. 5 व्या शतकात निर्माण झाली. पहिल्या टप्प्यातील शैलगृहांमध्ये खूप कमी शिलालेख आहेत. पण जे आहेत त्यावरून त्यांच्या निर्मितीसाठी राजाश्रय मिळाल्याचा कोणताही पुरावा दिसत नाही. वर उल्लेखलेली लेणी ही एकदम सगळी झालेली नव्हती. लेणे क्रमांक 10 हे यामध्ये सर्वात जुने आहे. हे एक भव्य चैत्यगृह आहे. इ.स.पूर्व दुसऱया शतकात तयार झालेल्या चैत्यगृहाच्या परंपरेतील या चैत्यगृहाचेही मुखदर्शन लाकडी जाळीचे आणि लाकडाच्या भिंती आणि दरवाज्यांचे होते. ते आता संपूर्णपणे नष्ट झाले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने इथे आता नवीन दरवाजे आणि पक्षी आत जाऊ नयेत म्हणून जाळ्या बसवल्या आहेत. याच्याही छतावर लाकडी तुळया बसवल्या होत्या. पण आज त्यांचे अवशेषही दिसत नाहीत. या भव्य चैत्यगृहात दोन शिलालेख आहेत. प्रवेशद्वारावरच्या कमानीवर ‘वसिष्ठीपुत्र कटहादिन याने घरमुख (चैत्यगृहाचे मुख) दान दिले’ असे लिहिले आहे. तर आतमध्ये भिंतीवर ‘कन्ह (कृष्ण) या बाहड (बहाळ) येथील व्यक्तीने भिंत दान दिली आहे’ असे सांगणारा लेख आहे. हे लेख जेव्हा चैत्यगृह तयार झाले तेव्हाचे आहेत. यावरून कोणा एका व्यक्तीने याच्या निर्मितीसाठी पैसे दिले होते असे दिसत नाही. त्या काळातील पद्धतीप्रमाणे विविध भागातून येणारे भक्त अशा प्रकारच्या स्थापत्यनिर्मितीसाठी दान देऊन पुण्यकर्म करत असत. येथील लेखात उल्लेखिलेले बहाळ हे गाव जळगाव जिह्यातील अतिशय महत्त्वाचे पुरातत्त्वीय स्थळ जिथे ताम्रपाषाण युगापासूनचे वस्तीचे अवशेष मिळालेले आहेत.
येथील इतर शैलगृहांमध्ये महत्त्वाची अशी अजून दोन लेणी आहेत. लेणे क्रमांक 12 हा विहार आणि लेणे क्रमांक 9 हे चैत्यगृह. अजिंठा लयनसमूहातील सर्वात जुना विहार म्हणून क्र. 12 कडे पाहता येते. अतिशय सुबक कोरीव काम हे याचे वैशिष्टय़ आहे. येथील खोल्यांमध्ये भिक्षूंच्या निवासासाठी दगडी बाक कोरले आहेत.
चैत्यगृह क्र. 9 हे क्र. 10 पेक्षा आकाराने बरेच लहान आहे. साधारण इ.स. पूर्व 1 ल्या शतकात हे तयार झाले असावे असे वाटते. याचे मुखदर्शन लाकडी नसून संपूर्णपणे दगडात कोरलेले आहे. सुरुवातीच्या चैत्यगृहात लाकडी मुखदर्शन असल्याने पावसामुळे ते लाकूड खराब होत असणार. त्याच काळात हे अनेकदा घडल्याने कधीतरी तो परत परत होणारा खर्च वाचवण्यासाठी दगडी मुखदर्शन करण्याची युक्ती तत्कालीन स्थपतींना सुचली असावी आणि त्यांनी ती अमलात आणली असावी असे वाटते. पण यामध्ये एक प्रश्न महत्त्वाचा आहे की एवढे मोठे चैत्यगृह क्र. 10 असताना परत क्र. 9 हे का तयार केले? बौद्ध धर्माच्या इतिहासातील विविध टप्प्यांवर धर्म आणि तत्त्वज्ञानात जे काही बदल झाले त्याचे हे फलित असावे असे वाटते. अजिंठय़ामध्ये एकूण 4 चैत्यगृहे आहेत. त्यांची आणि इतर शैलगृहांची माहिती पुढच्या लेखात पाहू.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)































































