
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या 1500 हून अधिक श्री सेवकांनी पंढरपूर शहरात स्वच्छता मोहीम राबवून 23 टन कचरा जमा केला. या स्वच्छता मोहिमेमुळे शहरातील प्रमुख रस्ते, मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट चकचकीत झालेले पहायला मिळाले.
महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पंढरपूर येथे स्वच्छता मोहिमेचे रविवारी (2 मार्च 2025) आयोजन केले होते. पंढरपूर शहरात पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार 1500 सदस्यांमार्फत स्वच्छता अभियान राबविम्यात आले. सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन करण्यात आली. या कार्यक्रमाला तहसीलदार सचिन लंगोटे, पोलीस उप अधिक्षक डॉ. अर्जुन भोसले, प्रशासनाधिकारी सुनील वाळुजकर, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, डॉ. शरद वाघमारे, डॉ. तोडकर, पंढरपूर शहरातील विविध असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी व पंढरपूर शहरातील व्यापारी कमिटीचे अध्यक्ष सोमनाथ डोंबे, संत गाडगेबाबांचे राधेशजी बादले पाटील, मेडिकल असोसिएशनचे प्रशांत खलीपे, क्रेडाईचे अमित शिरगावकर, रनर्स असोसिएशनचे डॉ. मंदार सोनवणे, भारत विकास परिषदेचे मंदार लोहकरे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरातील विविध 15 ठिकाणी 1500 श्री सदस्यांनी 33 वाहनांमधून व 3 कॉम्पॅक्टरच्या सहाय्याने 23 टन कचरा गोळा करुन जुना कासेगाव रोडवरील कचर डेपो येथे पाठवला असल्याची माहिती पंढरपूर नगरपालिकेने दिली आहे.