
उत्तर नागपूरच्या शिरपेचातील तुरा मानल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरच्या दुरवस्थेबाबत काँग्रेस आमदार डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत सरकारला चांगलेच धारेवर धरले. 140 कोटी खर्चूनही बाबासाहेबांचा पुतळा अपूर्ण का? असा सडेतोड सवाल त्यांनी केला. त्यानंतर सरकारने या केंद्राच्या आधुनिकीकरणासाठी पावले उचलली आहेत. या केंद्रात आता ‘एआय आधारित स्मार्ट लायब्ररी’ आणि ‘डिजिटल लर्निंग सेंटर’ उभारण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी 5 कोटी रुपयांचा विशेष निधी जाहीर केला आहे. नितीन राऊत यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या कन्व्हेन्शन सेंटरमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याचे रखडलेले काम आणि विद्यार्थ्यांच्या अडवणुकीचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. अभ्यासिकेत केवळ 30 विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो आणि सोयीसुविधांचा अभाव आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.






























































