
बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह शिवाजीनगर येथील नाल्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जैनब मोहम्मद इकबाल शेख असे मृत मुलीचे नाव आहे. याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
जैनब ही शिवाजीनगर परिसरात राहत होती. शुक्रवारी जैनब ही कचरा फेकण्यासाठी घराबाहेर पडली होती, पण ती घरीच आली नाही. रात्री तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. ती मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. शनिवारी सायंकाळी स्थानिक रहिवाशांना नाल्यातून दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर स्थानिकांनी याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. काही वेळात शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी नाल्यातील ढिगाऱयाखालून कुजलेला मृतदेह काढला. तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. घडल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर काही बाबी स्पष्ट होणार आहेत.