
पुणे शहरात महावितरणकडून गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या परवानगीशिवाय सक्तीने टी.ओ.डी. वीजमीटर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, या नवीन वीजमीटरमुळे वीजबिले दुप्पट येऊ लागली आहेत. याबाबत महावितरणला विचारणा केल्यानंतर महावितरण अदानी कंपनीकडे बोट दाखवत आहे.
महावितरणकडून वीजग्राहकांना टीओडी (टाइम ऑफ डे) वीजमीटर मोफत बसविले जात आहेत. पुणे परिमंडलात आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या 4 लाखांहून अधिक ग्राहकांना वीजमीटर बसविण्यात आले आहेत. हे मीटर बसवण्याचे कंत्राट विविध कंपन्यांना विभागून दिले असून, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने स्मार्ट मीटर बसवण्यासाठी मागवलेल्या सहा निविदा पैकी दोन अदानी समूहाने मिळवल्या आहेत. पुण्यात अनेक ठिकाणी अदानींच्या पंपनीचे लोक परस्पर मीटर बसवून जात आहेत. मात्र, हे नवीन वीजमीटर बसविण्यामुळे वीजग्राहकांची डोकेदुखी वाढल्याचे दिसून आले आहे. जुन्या वीजमीटरच्या बिलाच्या तुलनेने नवीन मीटर बसवल्यानंतर दुप्पट ते तिप्पट बिल येत आहे.






























































