
‘भारत जोडो’च्या माध्यमातून चांगले वातावरणही निर्माण झाले होते, पण विधानसभा निवडणुकीवेळी जागा वाटपामध्ये आम्ही फार वेळ घालवला. यामुळे महाविकास आघाडीचे नुकसान झाले, अशी कबुली काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली.
विधानसभेला आधी जागा वाटप ठरवून आम्ही पुढे जायला हवे होते.जागा वाटपाचा निर्णय लवकर झाला असता तर प्रचाराला आम्हाला वेळ मिळाला असता. लोकसभेला आम्हाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे विधानसभेलाही आम्ही येऊ, असा समज आमच्यात निर्माण झाला. आम्ही थोडे गाफील राहिलो, त्यामुळे आमचा पराभव झा ला, असे सतेज पाटील म्हणाले. हरयाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीची वेळ बदलली. आम्ही त्या वेळेला सर्वोच्च न्यायालयात जायला हवे होते, असेही सतेज पाटील म्हणाले.
महायुतीने जनतेच्या मनात भीती पसरवली
निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना आणून तीन महिन्यांचे पैसे दिले. विविध योजनांच्या माध्यमातून एका पुटुंबाच्या खात्यात 50 हजार रुपये दिले. लाडकी बहीण योजनेचे मेळावे घेऊन महाविकास आघाडीचे सरकार आले तर ही योजना बंद होईल, अशी भीती जनतेच्या मनात सत्ताधाऱ्यांनी निर्माण केली. याचा परिणाम मतदानावर झाल्याचे सतेज पाटील म्हणाले.