
नाशिकच्या करन्सी नोट प्रेस येथे कनिष्ठ टेक्निशियन आणि पर्यवेक्षक पदाच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवून परीक्षा पास केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बिहारमधील सातजणांविरोधात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. परीक्षेत डमी उमेदवार बसवले तसेच बनावट प्रमाणपत्र त्याने सादर केली.
नाशिक येथे करन्सी नोट प्रेस आहे. येथे हिंदुस्थानी चलनातील नोटांची छपाई केली जाते. 1928 मध्ये ही प्रेस सुरू केली होती. 1925 पासून पोस्टल स्टेशनरी आणि स्टॅम्पच्या छपाईला सुरुवात झाली. 1962 मध्ये नवीन ठिकाणी स्थलांतरित झाले आणि तेथे एक रुपयाच्या नोटा छापण्यास सुरुवात झाली.
तीन वर्षांपूर्वी करन्सी प्रेस येथे कनिष्ठ टेक्निशियन (मुद्रण /नियंत्रण) कनिष्ठ टेक्निशयन (कार्यशाळा /इलेक्ट्रिकल ) व पर्यवेक्षक पदासाठी भरती घेण्यात आली होती. पवईच्या एका आयटी पार्कमध्ये 13 मार्च 2022 आणि 4 एप्रिल 2023 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेत सातजणांनी कटकारस्थान रचले. डमी उमेदवार बसवून ते परीक्षा पास झाले. परीक्षा पास झाल्यावर त्याने मुलाखतीदरम्यान बनावट आयटीआय संस्थेचे प्रमाणपत्र आणि डिप्लोमा इलेक्ट्रिकचे प्रमाणपत्र सादर केले. ते प्रमाणपत्र सादर करून त्याने करन्सी नोट येथे नोकरी प्राप्त केली.
हा प्रकार नुकताच करन्सी नोट कार्यालयाच्या लक्षात आला. त्यानंतर करन्सी नोट कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने उपनगर पोलीस ठाणे नाशिक येथे धाव घेतली. उपनगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तो पवई पोलिसांना वर्ग केला, ज्याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहेत ते सात जण हे बिहारच्या नालंदा येथील रहिवासी आहेत.