
पश्चिम रेल्वेवर 26 ते 30 डिसेंबरपर्यंत घेतल्या जाणाऱ्या ब्लॉकदरम्यान बेस्टने मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरात जादा बसफेऱ्या चालवण्यास तयारी दर्शवली आहे. रेल्वे प्रशासनाच्या विनंती पत्रानुसार बेस्ट प्रशासन प्रवासी सेवेसाठी सज्ज झाले आहे. प्रवाशांच्या गरजेनुसार भाईंदरपर्यंत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
बोरिवली आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर 26 ते 30 डिसेंबरदरम्यान मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या अवधीत 350 हून अधिक लोकल फेऱ्या पूर्णतः रद्द आणि 150 फेऱ्या अंशतः रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त बसफेऱ्यांसाठी बेस्टला साकडे घातले होते. रेल्वेच्या पत्रावर बेस्टने बुधवारी सकारात्मक उत्तर दिले. पाच दिवसांच्या ब्लॉक काळात बेस्टच्या मागाठाणे, गोराई, दिंडोशी, मजास, प्रतीक्षानगर, वडाळा, काळा किल्ला (धारावी) या आगारांतून अतिरिक्त बसफेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने 371, 372, 709, 718, 705, 706, 440 या बसमार्गांचा समावेश असल्याचे बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी सांगितले.






























































