मेक्सिकोला 6.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंपाचा धक्का; दोन जणांचा मृत्यू, 50 घरांचे नुकसान

मेक्सिकोची राजधानी आणि पॅसिफिक किनारपट्टीवरील पर्यटन स्थळे शुक्रवारी सकाळी 6.5 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाने हादरली. या भूकंपामुळे दोन लोकांचा मृत्यू झाला असून सॅन मार्कोस शहरात घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार (USGS), हा भूकंप सकाळी 8 वाजण्यापूर्वी अकापुल्को या प्रमुख बंदराजवळ झाला. ज्याचे धक्के 400 किलोमीटर दूर असलेल्या मेक्सिको सिटीपर्यंत जाणवले.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीत मेक्सिको सिटीमधील एका 67 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. भूकंपाच्या वेळी बचावासाठी इमारतीतून बाहेर येत असताना शिड्यांवरून पडल्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शहराच्या महापौर क्लारा ब्रुगाडा यांनी सोशल मीडियावर या भूकंपाबाबत माहिती दिली आहे. या शक्तिशाली भूकंपामुळे 2 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. भूकंप इतका तीव्र होता की, नवीन वर्षाची पहिली पत्रकार परिषद घेत असलेल्या राष्ट्रपती क्लॉडिया शीनबॉम यांनाही तातडीने राष्ट्रपती भवन रिकामे करावे लागले.

सॅन मार्कोसचे महापौर मिसाएल लोरेन्झो कॅस्टिलो यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे सुमारे 50 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून जवळजवळ सर्वच घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. घराचे छत अंगावर कोसळल्याने एका 50 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, असे त्यांनी सांगितले.