महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडरना बंदी

इंग्लंडच्या एफएने (फुटबॉल संघटना) महिला फुटबॉलमध्ये ट्रान्सजेंडरना खेळता येणार नसल्याचे जाहीर करून 24 तासही झाले नाहीत तोच आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळानेही (ईसीबी) महिला आणि मुलींच्या क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडरला बंदी घालण्यात आल्याचे जाहीर केले.

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानेच ट्रान्सजेंडर खेळाडूंबाबत नवा कायदा केला होता. त्यानुसार ट्रान्सजेंडर खेळाडूंच्या खेळण्याबाबत नवी नियमावली तयार करण्यात आली. त्यानुसार आधी एफए आणि पाठोपाठ ईसीबीनेही महिलांच्या खेळांमध्ये ट्रान्सजेंडरला खेळता येणार नसल्याचे स्पष्ट केले. या नियमानुसार ज्या महिला जैविकदृष्टय़ा स्त्रीलिंगी आहेत त्यांनाच महिला आणि मुलींच्या क्रिकेट सामन्यांमध्ये आणि स्पर्धांमध्ये खेळता येणार असल्याचे ईसीबीने पत्रकाद्वारे कळवले. तसेच ट्रान्सजेंडर महिला या पुरुष आणि मिश्र गटाच्या क्रिकेटमध्ये आपला खेळ सुरू ठेवू शकतात, असेही ईसीबीने सांगितले. न्यायालयाच्या सुधारित निर्णयानंतर आपण हा बदल करण्यास प्रेरित झाल्याचेही ईसीबीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.