
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. ईडीने त्यांचे मुंबईतील १७ मजली आलिशान निवासस्थान, अबोड तात्पुरते जप्त केले आहे. अनिल अंबानी यांच्या समूह कंपनी, रिलायन्स कम्युनिकेशन्सशी संबंधित एका कथित बँक फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. या मालमत्तेची किंमत ₹३,७१६.८३ कोटी असल्याचा अंदाज आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पाली हिल परिसरात असलेल्या या ६६ मीटर उंच आलिशान इमारत मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) तात्पुरते जप्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या कारवाईसह, या प्रकरणात जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य अंदाजे ₹१५,७०० कोटींवर पोहोचले आहे. सदर जप्ती आरकॉममधील कथित आर्थिक अनियमितता आणि कर्ज फेरफारच्या व्यापक चौकशीचा एक भाग आहे. सीबीआयने दाखल केलेल्या दोन एफआयआरनंतर ईडीची कारवाई आहे. या एफआयआरमध्ये रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या विविध कंपन्यांविरुद्ध फसवणूक, लाचखोरी आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
पीएमएलएच्या कलम १७ अंतर्गत समूहाशी संबंधित ३५ हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत ५० हून अधिक कंपन्यांचा समावेश होता आणि मुंबई आणि दिल्लीतील २५ हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. सूत्रांनुसार प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, २०१७ ते २०१९ दरम्यान येस बँकेकडून घेतलेले अंदाजे ३ हजार कोटी रुपये कर्ज पद्धतशीरपणे वळवण्यात आले होते. तपास संस्था हा निधी शेल कंपन्यांद्वारे (राउंड-ट्रिपिंग) परत पाठवण्यात आला आहे का याचाही शोध घेत आहेत. जुन्या तारखेचे क्रेडिट मंजूरी मेमोरँडम, योग्य ती काळजी न घेता कर्ज मंजूर करणे आणि औपचारिक मंजुरीपूर्वी निधी सोडणे यासारख्या गंभीर आरोपांची देखील चौकशी केली जात आहे.




























































