
युक्रेन आणि रशिया यांच्यात चांगलेच युद्ध पेटले असून रोज या ठिकाणी शेकडो लोक मरत आहेत. रशियन लष्करात आतापर्यंत एकूण 91 हिंदुस्थानी तरुण भरती झाले आहेत. त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 14 जणांनी रशिया सोडले आहे. रशियन लष्करात भरती झालेले 69 तरुण सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत दिली. एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने ही माहिती दिली. हिंदुस्थानी तरुणांना धोका देऊन रशियाला पाठवणाऱया आरोपींविरुद्ध केंद्र सरकार काय कारवाई करत आहे? तसेच रशियन लष्कर हिंदुस्थानी तरुणांना परत पाठवत नसेल तर केंद्र सरकार या प्रकरणाचा विरोध करेल का? असे सवाल केले.
चार मृतदेह हिंदुस्थानात आणले
रशियात भरती झाल्यानंतर युद्धात मरण पावलेल्या चार हिंदुस्थानी तरुणांचे मृतदेह हिंदुस्थानात आणले. दोन प्रकरणांत रशियाला डीएनए नमुने पाठवले आहेत. ज्यांचे डीएनए नमुने पाठवले ते हरयाणा आणि पंजाबचे रहिवासी होते. यूपीच्या एका व्यक्तीचे अवशेष आणले जातील.