कृपया आम्हाला जगू द्या… आठ वर्षाच्या बालकाची जिल्हाधिकाऱ्यांकडे भावनिक विनंती, प्रकरण काय?

आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रस्ता रुंदीकरणासाठी जेवणाची गाडी हटवल्याने एका आठ वर्षीय मुलाने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत भावनिक साद घातली आहे. जेवणाचा गाडी बंद झाल्याने आमचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. यामुळे माझी आई मरणाची इच्छा व्यक्त करतेय. कृपया आम्हाला जगण्यास मदत करा, अशी भावनिक विनंती केली आहे.

यशवंत असे या आठ वर्षाच्या मुलाचे नाव असून तो हृदयरोगाने त्रस्त आहे. यशवंतचे कुटुंब गुंटूर शहरातील वेंकटराव पेटा येथील रहिवासी असून त्याची आई उदरनिर्वाहासाठी सरकारी रुग्णालयाजवळ जेवणाची गाडी लावत असे. मात्र रस्ता रुंदीकरणासाठी यशवंतच्या आईची गाडी महापालिकेने हटवली. त्यांना पर्यायी जागाही देण्यात आली नाही. यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले.

आपल्याला पर्यायी जागा देण्यात यावी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा यासाठी चिमुकल्या यशवंतने जिल्हाधिकारी नागलक्ष्मी यांच्याकडे याचिका दाखल केली. यात त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी आपली गाडी कालव्यात फेकून दिली, ज्यामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. आपल्या आईने परिस्थितीमुळे खूप निराश होऊन आपले जीवन संपवण्याचा विचार व्यक्त केला होता, असे यशवंतने याचिकेत म्हटले आहे.

आम्हाला आमची जेवणाची गाडी पुन्हा सुरू करायची आहे, कृपया आम्हाला जगण्यास मदत करा, असे भावनिक आवाहन पुढे यशवंतने केले आहे. मुलाच्या धाडसाने प्रभावित झालेल्या जिल्हाधिकारी नागलक्ष्मी यांनी याचिका स्वीकारली. त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ही समस्या तातडीने सोडवण्याचे आणि कुटुंबाला उपजीविकेचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.