मीनाक्षी शिंदेंच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ, गलिच्छ, शिवराळ शब्दांचा वापर; आगरी समाज भडकला

माजी महापौर व शिंदे गटाच्या प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार मीनाक्षी शिंदे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह आणि गलिच्छ शब्दांचा वापर केला आहे. त्यामुळे आगरी बांधव भडकले असून शिंदे गटाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. या ऑडिओ क्लिपमुळे मीनाक्षी शिंदे वादात सापडल्या आहेत.

ठाणे पालिकेच्या निवडणुकीत शिंदे गटात झालेल्या बंडखोरीमुळे मानपाडा, कोलशेत या भागातील प्रभाग क्रमांक 3 मधील निवडणूक आता चर्चेचा विषय बनली आहे. याच प्रभागातून निवडणूक लढवीत असलेल्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची एक कथित ऑडिओ क्लिप आज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. या ऑडिओ क्लिपमध्ये मीनाक्षी शिंदे यांनी थेट आगरी समाजाला उद्देशून अपमानास्पद शब्द वापरल्याने आगरी समाजात तीव्र नाराजी पसरली असून त्यांच्या या वक्तव्याचा आगरी, कोळी समाजाकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे. क्लिपमधील आवाज माझा नसून मॉर्फ असल्याचा दावा मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, भिवंडीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेत मीनाक्षी शिंदे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

नेमकं काय आहे संभाषण?

कथित ऑडिओ क्लिपमध्ये भूषण भोईर याला महिलांना घरी पाठवून मारण्याची धमकी दिली आहे. 16 जानेवारीनंतर आम्ही कोण हे दाखवून देऊ, तुम्हाला रस्त्यावर आणायला वेळ लागणार नाही. पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायला लावेन, निवडणुकीनंतर तुम्हाला मानपाड्यातच राहायचे आहे ना? सीपींना कॉल करून काय वाट लावायची असेल ती लावेन असा उल्लेख करीत आगरी समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे.

 ठाण्याचे राजकीय वातावरण शिंदे गटाने दूषित केले

शिंदे गटाच्या या दादागिरीवर शिवसेना व मनसेने टीकेची झोड उठवली आहे. ठाण्याचे राजकीय वातावरण शिंदे गटाने दूषित केले असून सत्तेच्या जोरावर खुलेआम धमक्या दिल्या जात आहेत. ठाण्याच्या प्रथम नागरिक पदाची जबाबदारी सांभाळलेल्या व्यक्तीकडून अशी भाषा शोभते का? शिंदे गटाने मराठी संस्पृती धुळीस मिळवली आहे, असा थेट हल्लाबोल शिवसेना महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, मनसेच्या ठाणे शहर अध्यक्षा समीक्षा मार्पंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केला आहे. मॉर्फ तसेच एआयची ऑडिओ क्लिप म्हणणे हे हास्यास्पद असून मीनाक्षी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.